नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महिला विश्वचषक २०२५ च्या स्पर्धेतील अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघ विश्वचषक विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरल्यास पैशांचा पाऊस पडणार आहे. स्वप्नातही पाहिली नसेल इतकी रक्कम प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला येणार आहे.
उपांत्य सामन्यात दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडवर १२५ धावांनी धुळ चारली होती तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. यानंतर आता मोठी अपडेट समोर आली असून भारतीय संघ फायनल जिंकल्यास त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जर भारतीय महिला क्रिकेट संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना जिंकला, तर बीसीसीआय त्यांना १२५ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस देण्याची तयारी करत आहे. बीसीसीआय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला पुरुष संघाइतकेच बक्षीस दिले जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेला हरवत महिला संघाने पहिल्या विश्वचषकावर नाव कोरल्यास BCCI कडून १२५ कोटी रूपयांचे बक्षीस देण्याची तयारी करण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बीसीसीआय पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतन देण्यावर विश्वास ठेवते. म्हणूनच, जर आमच्या महिला संघाने विश्वचषक जिंकला तर त्यांचे बक्षीस पुरुष संघापेक्षा कमी नसावे, यावर आम्ही चर्चा केली. दरम्यान, जेव्हा भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा बीसीसीआयने खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह संपूर्ण संघाला 125 कोटी रुपयांचा मोठा बोनस दिला होता. जर महिला संघाने यावेळी विजेतेपद जिंकले तर त्यांना समान रक्कम म्हणजे 125 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
आयसीसीने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जाहीर केले की, २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकातील विजेत्या संघाला आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मिळेल. यावर्षी, विजेत्या संघाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ₹39.55 कोटी मिळतील. ही बक्षीस रक्कम मागील विश्वचषक, २०२२ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपेक्षा चार पट जास्त आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




