सोनगीर -जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना दोन दिवसांपूर्वी येथील एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान त्याच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी धुळे येथे नेण्यात आले आहे. कोव्हीड-19 उपाय योजनेतंर्गत संपूर्ण गाव बाधित क्षेत्र म्हणून जाहीर झाले असून गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार पुढील 14 दिवस बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
येथील मोठी मरीआई मंदिर परिसरातील इंदिरानगर भागात राहणारी 35 वर्षीय व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून सतत आजारी होती. त्यामुळे ती अंथरुणाला खिळून होती. पाच दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू दाखल केल्याच्या काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. कोरोना संशयित म्हणून रुग्णालय प्रशासनाने त्याची चाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल दि. 28 रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला व तो सकारात्मक आला. यामुळे त्याचे शव जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले. चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर रात्रीच प्रशासनाने बाधित व्यक्ती राहत असलेला भाग सील केला.
दरम्यान आज दि. 29 रोजी सकाळी येथील मंडळ अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोव्हीड-19 बाधित क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना संदर्भात बैठक घेतली. यावेळी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्राम विकास अधिकारी, तलाठी आरोग्य सेवेतील कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदारांनी सोनगीर गाव बाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याचे व गावात संचारबंदी लागू केल्याचे यावेळी सांगितले. तसेच गावात घरोघरी आरोग्य सर्व्हेक्षण करण्याचेही आदेश दिले.
मयताच्या कुटुंबातील सहा जणांना तपासणीसाठी धुळे येथे नेण्यात आले असुन संबंधित भाग बांबू बांधून सील करण्यात आला आहे. चौदा दिवस गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून खबरदारी बाळगण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने रिक्षा फिरवून केले.