श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
महिन्याला सहा ते आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 73 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन अंबादास गांगर्डे (रा. मांदळी, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून इन्फनाईट बिकॉन कंपनीच्या बारा संचालकांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केलेल्या दोघांना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधार नवनाथ औताडे दुबईला गेल्याचे समजते. बाकीचे संचालक देखील नॉट रिचेबल झाले आहेत.
दरम्यान, सिस्पे नाव असलेल्या पण या नावाने काहीच नसलेल्या कंपनीने नगर, श्रीगोंदा, पारनेर, पुणे, सोलापूरसह राज्याच्या बाहेर अनेक ठिकाणी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवत किमान तीन ते चार हजार कोटी रुपये गोळा केले. शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी कुठलेच लायसन्स नसताना हे पैसे गोळा केले.
सिस्पे नावाच्या मल्टिनिधी कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून पैसे जमा केले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली भरमसाठ परतावा दिला. गुंतवणूकदारांना मुळ रकमेवर महिन्याला बारा टक्के परतावा देण्यात आला. त्यामुळे कंपनीकडे कोट्यवधी रुपये गोळा केले गेले. एजंटने कमिशनसाठी जनसामान्यांपर्यंत जाऊन पैसे गोळा केले. अनेक नोकरदार, कामगार, शेतकरी, महिला यांनी अती लाभाच्या आमिषाने या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. आता मात्र या सर्वांवर पश्चातापाची वेळ आली आहे.
याच कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक वर्षापूर्वी दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी तालुक्यातील एका राजकीय नेत्याच्या उपस्थितीत इन्फनाईट मल्टिस्टेट सोसायटीचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे इन्फनाईट मल्टिस्टेट सोसायटीत पैसे न टाकता हे पैसे दुसर्या बँकेच्या अकाउंटवर एजंटमार्फत भरले जात होते, त्याची कुठलीही पावती देण्यात येत नव्हती. मोबाईल एप्लिकेशनवर ट्रेड टाकले जात असल्याचे सांगण्यात येत होते आणि याचा सरकारला कुठला टॅक्स जात नव्हता. रेकॉर्ड होऊ नये म्हणून सहा महिन्यांनी कंपनीचे नाव बदललेे. वेगवेगळ्या एलएलपी कंपन्या आणि काही संचालक तेच ठेवून सुरू असलेल्या या कंपनीचा फुगा सहा महिन्यांपूर्वी फुटला आणि गुंतवणूकदारांना पैसे येणे बंद झाले.
आता श्रीगोंदा पोलिसांत दाखल गुन्ह्यात नवनाथ जगन्नाथ औताडे, अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, गौरव सुखदिवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, ययाती मिश्रा, शुभम नवनाथ औताडे, सुवर्णा नवनाथ औताडे, रंगनाथ उर्फ पिंटू गलांडे, अनिल दरेकर, संदीप दरेकर अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अनिल दरेकर आणि रंगनाथ उर्फ पिंटू गलांडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच प्रकारानंतर श्रीगोंदा पंचायत समिती समोरील इन्फनाईट मल्टिस्टेटला भलेमोठे ताले लागले आहेत. तर नवनाथ औताडे, दरेकर यांसह बाकीचे संचालक यांचे फोन लागतनाहीत.
आरोपींच्या अटकेसाठी भाजपचे राजेंद्र म्हस्के करणार उपोषण
शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा, पारनेर, नगरच्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणारा नवनाथ औताडे हा सराईत गुन्हेगार आहे त्याला आणि इतर सर्व संचालकांना तातडीने अटक करावी, त्यांचे पारपत्र जप्त करावे अशी मागणी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. ते सोमवारपासून (दि.14) रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. राजेंद्र म्हस्के म्हणाले, श्रीगोंदा तालुक्यात विविध कंपन्यांच्या नावाने जादा परतावा देऊन कोट्यवधी रुपये गुंतवणूक करून घेणार्या सिस्पे, इन्फनाईट बिकॉन कंपनी आदी कंपन्यांचे संचालक नवनाथ औताडे यांनी गुंतवणूकदारांना लाभाचे आमिष दाखवत पैसे गोळा केले आहेत.
मात्र, परतावा आणि मुद्दल आता परत दिले जात नाही. हा आर्थिक घोटाळा 2015 पासून पारनेर आणि श्रीगोंदामध्ये सुरू आहे. गुन्हा दाखल व्हावा अशी इच्छा औताडे याचीच होती. सर्व वर्गातील पैसे गुंतले आहेत; गोरगरीबांचेही पैसे अडकले आहेत. अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे आले नाहीत कारण त्यांना पैसे देण्याची हमी दिली जात होती. गोळा केलेले पैसे कुठेच गुंतवले नाहीत. पोलीस यंत्रणेने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी काम करावे. औताडेवर देखील त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. औताडे आणि इतर सर्व संचालकांना अटक करावी, अशी मागणीही म्हस्के यांनी केली आहे.
राजकीय नेत्यांचा वापर
एक वर्षापूर्वी श्रीगोंदामध्ये संत शेख महंमद मंदिरासमोर आलिशान कार्यक्रम करत वादळात दिवा लावण्याचे स्वप्न दाखवत तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या उपस्थितीत मल्टिस्टेट उद्घाटन झालेे. नेत्यांची उपस्थिती पाहून कंपनीत नव्याने गुंतवणूक झाली, पण आता सगळेच गायब झाले आहेत. सुप्यातही असाच प्रकार करत कंपनीने राजकीय नेत्यांचा वापर केला.
पारनेरमध्ये अनेकांना गंडा
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहत परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्या इन्फनाईट मल्टिस्टेट कंपनीने गाशा गुंडाळला असून पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून अनेक हेलपाटे मारूनही आपली ठेव मिळत नसल्याने दोन ठेवीदारांनी मंगळवारी (दि.8) सुपा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
सुप्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी यास दुजोरा दिला आहे. सुपा पोलिस लवकरच गुन्हा दाखल करणार आहेत. या कंपनी चालकांतर सोमवारी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पारनेर तालुक्यातील ठेवीदार आता ठेवी मिळत नसल्याने गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या कंपनीत घसघशीत कमिशन घेऊन गब्बर झालेले दलाल व एजंटांचे धाबे दणाणले आहे. सुपा व परिसरातील अनेक व्यवसायिक, शिक्षक, उद्योजक, शेतकरी पैसे परत मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत, आणि कंपनीशी संबंधित व्यक्ती नॉट रिचेबल आहेत.
मागील काही दिवसांपासून कंपनीचे कार्यालयही बंद झाले आह. दरम्यान, बुधवार अखेर चार ते पाच व्यक्तींनी तक्रार अर्ज केले आहेत. गुंतवणूकदारांनी सविस्तर रक्कमांसह तक्रार दाखल केली तर संबंधितावर गुन्हे दाखल केले जातील, असे सुप्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सांगितले आहे.




