अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इन्फिनिटी बिकॉन इंडिया प्रा. लि. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोघा एजंटचा डिफॉल्ट जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. रंगनाथ तुळशीराम गलांडे (वय 40 रा. देऊळगाव गलांडे, ता. श्रीगोंदा) व अनिल झुंबर दरेकर (वय 32 रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदा) अशी जामीन अर्ज नामंजूर केलेल्या अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, यापूर्वी न्यायालयाने या दोघा संशयित आरोपींचा नियमित जामीन अर्ज नामंजूर केला होता.
नवनाथ औताडे व त्याच्या टोळीने हजारो गुंतवणूकरांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात श्रीगोंदा, सुपा, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये एजंट गलांडे व दरेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास उशिर केल्याच्या मुद्द्यावरून संशयित आरोपींच्या वतीने डिफॉल्ट जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. आरोपी पक्षाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यात आली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात 60 दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले नाही. मुदतीत आरोपपत्र दाखल न केल्याने संशयित आरोपींना जामीन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकिल अॅड. पुष्पा कापसे- गायके व अॅड. केदार केसकर तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला. सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 316 (5) (विश्वासाने सोपविलेल्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे गैरवापर करणे) या कलमाची वाढ करण्यााात आल्याने दोषारोपपत्र दाखल करण्यास 60 दिवसां ऐवजी 90 दिवसांची मुदत असून सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल असे न्यायालयासमोर सांगितले. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद मान्य करीत दोघा एजंटांचा डिफॉल्ट जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
पोलिसांचे गुंतवणूकदारांना आवाहन
ज्या गुंतवणूकदारांची सिस्पे-ट्रेडस-इन्फिनिटी कंपन्यांकडून फसणूक झाली आहे त्यांनी आपल्याकडील आर्थिक फसवणूकीच्या कागदपत्रांसह येथील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, पैसे अडकलेल्या जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी आपले जबाब पोलिसांकडे नोंदवावे, असे आवाहन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी केले आहे.




