मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. काही मतदारांनी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत यावर उत्तर दिले आहे. आम्ही गेल्या 15 वर्षांपासून हीच शाई वापरत आहोत. एकदा शाई लावली आणि ती सुकली की ती निघू शकत नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदान सुरु असतानाच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, बोटाला मार्करद्वारे लावत असलेली शाई एकदा सुकली की ती निघू शकत नाही. ज्या लोकांनी शाई पुसण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी काय वापरले हे आम्हाला माहिती नाही. समाजात फेक नरेटिव्ह पसरवल्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर पत्रकारांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्करचा वापर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
मार्कर पेन ऐवजी इंडिलेबल इंकचा वापर
याला उत्तर देताना वाघमारे यांनी, ‘मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत.’ अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता ५ फेब्रुवारीला मार्करऐवजी काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.
मार्कर पेनने केलेला मार्क हा नुसत्या पाण्याने, थिनरने किंवा सॅनिटायझरने जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निवडणूक आयोगाला यावरून फैलावर घेतले. बोगस मतदान करण्यासाठी पोषक अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यानं विरोधकांनी कडाडून टीका केली.
दरम्यान, सामन्य नागरिकांकडूनही तशा तक्रारी आल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असून पुढच्या निवडणुकीत मार्कर पेन ऐवजी पारंपरिक शाईच वापरण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.





