नागपूर । Nagpur
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी २९ महानगरपालिकांची निवडणूक आज, १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडत आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदारांना आपला कौल नोंदवता येणार आहे. सकाळपासूनच राज्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत असून, अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केले. “मतदान हे केवळ आपले अधिकार नसून ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान न करणे हा लोकशाहीचा अपमान आहे,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच, त्यांनी भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
निवडणूक प्रक्रियेत यावेळी बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईऐवजी ‘मार्कर पेन’चा वापर केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी ही शाई सहज पुसली जात असल्याचा दावा केला आहे. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “निवडणूक आयोग सर्व निर्णय घेत असतो आणि यापूर्वीही मार्करचा वापर झाला आहे. जे लोक उद्याच्या पराभवाचा अंदाज घेऊन आजपासूनच शाईवर भाष्य करत आहेत, ते केवळ निकालाला दोष देण्यासाठी तयारी करत आहेत.”
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मात्र या प्रकरणावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. “आजवर बोटाला शाई लावली जायची, पण आता मार्करने खूण केली जात आहे. ही खूण सॅनिटायझरने पुसली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. फ्रॉड करून निवडणुका जिंकायचा हा प्रयत्न आहे,” असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. अशा पद्धतीने निवडणुका घेणे हे लोकशाहीचे लक्षण नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
बोटावरील शाई पुसली जात असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या तक्रारींची दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आता मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना ‘शाई गडद आणि त्वचेला लागेल’ अशा पद्धतीने लावण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील या २९ महानगरपालिकांच्या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, संध्याकाळपर्यंत मतदानाचा टक्का किती वाढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




