Saturday, May 4, 2024
Homeनगरकासारा दुमाला येथील वादग्रस्त देशी दारु दुकानाची अखेर चौकशी सुरु

कासारा दुमाला येथील वादग्रस्त देशी दारु दुकानाची अखेर चौकशी सुरु

संगमनेर (शहर प्रतिनिधी) –

शहरालगतच्या कासारा दुमाला येथील बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या देशी दारू दुकानाची अखेर चौकशी सुरू झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या चौकशीसाठी संगमनेर बाहेरील अधिकार्‍याची नियुक्ती केली असून या अधिकार्‍यांनी चौकशी सुरू केली आहे.

- Advertisement -

या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येणार असल्याने देशी दारू दुकानाच्या मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे गेल्या काही वर्षांपासून हे देशी दारू दुकान सुरू आहे. ग्रामपंचायतीने कुठलाही ना हरकत दाखला दिलेल्या नसतानाही हे दुकान गावामध्ये खुलेआम सुरू आहे.

दुकान मालकाने दुकानाची जागा हस्तांतरित करताना भूमिअभिलेख खात्याचे खोटे कागदपत्र सादर करून दुकानाला परवाना मिळवण्याचे उघडकीस आले आहे. यामुळे या दुकाना विरुद्ध काही ग्रामस्थांनी उत्पादन शुल्कच्या संगमनेर येथील अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र या अधिकार्‍यांनी या तक्रारींची दखल घेतलेली नाही.

एका ग्रामस्थाने भुमी भुमिअभिलेख खात्याकडे अर्ज करून या दुकाना बाबत माहिती घेतली. आमच्या कार्यालयातून या दुकानाला कोणताही दाखला देण्यात आलेला नाही असे या कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. संबंधित दुकान मालकाने भुमिअभिलेखचा खोटा दाखला बनवून उत्पादन शुल्क च्या स्थानिक अधिकार्‍यांना दिला होता. याबाबत ‘दैनिक सार्वमत’ ने वारंवार आवाज उठवलेला आहे. सार्वमत वृत्ताची राज्य उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे.

या दुकानाला परवाना कसा दिला याची चौकशी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या कोळपेवाडी येथील एका अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आपण भूमी अभिलेख खात्याशी पत्रव्यवहार केला असून त्यांचे पत्र आल्यानंतर चौकशी सुरू करू असे त्यांनी सांगितले. यामुळे बेकायदेशीर देशी दारू दुकान चालविणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक अधिकार्‍यांनी गडबड करू नये या उद्देशाने बाहेरच्या अधिकार्‍यांची चौकशीसाठी नियुक्ती केल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे. अधिकार्‍यांच्या चौकशीत काय निष्पन्न होते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष

देशी दारू दुकानला परवानगी देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची चौकशी केली जाते. यासाठी स्वतंत्र समिती अस्तित्वात आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकार्‍यांचा ही समावेश असतो. कासारा दुमाला येथील देशी दारू दुकानाला परवाना देताना नियमांचा भंग केल्याचे समोर येत आहे. याबाबत स्थानिक अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले होते. याशिवाय राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक तसेच जिल्हाधिकार्‍यांचा ही या समितीमध्ये समावेश असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. दरम्यान या दुकानाबाबत एवढी चर्चा होत असतानाही संचारबंदीत देखील हे दुकान छुप्या पद्धतीने सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या