अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नदी, खोर्यातील धरणांमध्ये पाण्याची तुट भरून काढणे, हाच पाणीटंचाईवर मात करण्याचा उपाय आहे. त्यादृष्टीने राज्य सरकाराने समुद्रात वाया जाणारे पाणी तुटीच्या खोर्यात वळविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी गोदावरी खोर्यात चार नदीजोड प्रकल्प राबविले जाणार आहेत, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यात चितळे समितीने 12 धरणे बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याऐवजी नदी, खोर्यांमध्ये असणारी तुट भरून काढण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री विखे यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या चौंडी (ता. जामखेड) येथे होणार्या संभाव्य बैठकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 19) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. मंत्री विखे यांनी बैठकीपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधत जिल्हा, राज्यातील विविध प्रश्नांवर भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात नव्याने धरणांच्या दृष्टीने चितळे समितीने 12 धरणे उभी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सध्याच्या परिस्थिती आहे. नदीपात्रातील धरणातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पावसाळ्यात वाहून वाया जाणारे अर्थात जास्तीचे पाणी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. गोदावरी नदी खोर्यात चार नदीजोड प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठी वाढणार आहे.
मुंबईत टँकर संघटनेने संप पुकारला आहे. त्यामुळे काही भागात पाण्याची समस्या आहे. या प्रश्नावर लवकरच मार्ग काढला जाणार आहे. टंचाईच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धरणामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा व इतर महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यासाठी येत्या बुधवारी (दि. 23) जलसंपदा अधिकार्यांची बैठक घेण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी पाणी दिले जाईल. पाण्याचा कोठे गैरवापर होत आहे का? कोठे अपव्यय होत आहे, यावर उपाययोजना ही केल्या जाणार आहेत.
स्कूलबसला जीपीएस, सीसीटीव्ही बसवा
श्रीगोंदे तालुक्यात स्कूल बस चालकाने एका विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूलबस संदर्भात काही गोष्टींची जबाबदारी निश्चित करावी लागेल. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या स्कूलबसला जीपीएस सिस्टीम तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. स्कूल बसची देखरेख करण्यासाठी संबंधित संस्थेतील शिक्षकाची नियुक्ती करावी. स्कूल बसबाबत संस्था चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोरण राबविले पाहिजे. बीड जिल्ह्यात महिला वकिलाला झालेल्या मारहाणीबद्दल विचारले असता, बीडच्या विषयावर काय बोलायचे? असे म्हणून या विषयावर बोलण्यास टाळले.
स्थानिकांनी समन्वयातून मिटवावेत
श्रीगोंदे शहरातील संत शेख महंमद बाबा यांच्या देवस्थानासंदर्भात वाद-विवाद सुरू आहे. श्रीगोंदे येथे या विषयावर बंद ही पाळण्यात आले होते. विखे म्हणाले की, बंद पाळून किंवा बाहेरच्या व्यक्तीने हस्तक्षेप केल्याने हे विषय मिटणार नाही. स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयातून या विषयावर मार्ग काढला पाहिजे.
कोणी एकत्र आल्याने फरक पडत नाही
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोणी एकत्र आल्याने काही बदल होणार नाही. आतापर्यंत कित्येक जण एकत्र आले आणि वेगळे ही झाले. त्यामुळे राजकीय परिस्थिती बदलत नसते. राज्यातील निवडणुकीत जनतेने महायुतीवर विश्वास व्यक्त केला आहे आणि दिवसेंदिवस हा विश्वास अधिक दृढ होत आहे.