अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहिल्यानगर व सोलापुर जिल्ह्यात व्यापार्यांची दुकाने फोडून कॉपर वायर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीने केलेले 8 गुन्हे उघडकीस आले असून 3 लाख 59 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
15 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील राशिन येथील व्यापारी नागेश पांडुरंग पवार यांच्या शिवम मशिनरी अॅण्ड टुल्स दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 64 हजार रूपये किमतीचे कॉपर वायर चोरून नेले होते. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यात वारंवार घडणार्या अशा कॉपर चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले होते. पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सलग आठ दिवस तपास सुरू ठेवला.
पोलिसांना संशयित आरोपींचे चारचाकी वाहन मिळून आले. तपासातून हे वाहन महादेव रंगनाथ पवार (रा. अकलुज, सोलापुर) वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेऊन त्याला आणि त्याचा साथीदार दादा लाला काळे (रा. सावंतगाव, ता. माळशिरस, जि. सोलापुर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आणखी सहा साथीदारांची नावे उघड केली. त्यापैकी रामा लंग्या काळे, महादेव बाबु काळे (धाराशीव), दिलीप मोहन पवार (अकलुज), सुरेश नामु काळे व सुरेश नामदेव चव्हाण (सवतगाव, माळशिरस) हे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या टोळीने कर्जत 2 गुन्हे, अकलुज (सोलापुर) 2 गुन्हे, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, वैराग (सोलापुर) प्रत्येकी 1 गुन्हा या सर्व गुन्ह्यांमध्ये कॉपर वायर चोरी केल्याची कबूली दिली. महादेव पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सोलापुर, सातारा, धाराशीव, पुणे व रायगड जिल्ह्यात दरोडा, घरफोडी व चोरीसह तब्बल 13 गुन्हे दाखल आहेत.




