अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मासिक 15 टक्के परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. नवनाथ सुभाष लांडगे (रा. देहरे, ता. नगर) व सचिन सुधाकर शेलार (रा. रेणुकानगर, एमआयडीसी) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी गोरख सिताराम वाघमारे (रा. पाथर्डी रस्ता, शेवगाव) यांनी सन 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या संस्थेमध्ये गुंतवणूक केली होती. संस्थेच्या पदाधिकार्यांनी त्यांना मासिक 15 टक्के परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. मात्र, ठरल्याप्रमाणे गुंतवणूक केलेली रक्कम व परतावा मिळाला नाही, तसेच शेवगाव येथील शाखा बंद झाली. या आर्थिक फसवणुकीबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, विश्वास बेरड, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, प्रशांत राठोड यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून गुन्ह्यातील नवनाथ लांडगे व सचिन शेलार यांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांना शेवगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.