Sunday, October 6, 2024
Homeनाशिकराज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाट्य महोत्सव सुरु करणार - उद्योगमंत्री उदय सामंत

राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाट्य महोत्सव सुरु करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठी रंगभूमीचा विस्तार आणि प्रसार करण्यासाठी नाट्यकला जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे. यासाठी कलाकारांनीच आपल्या सहकार्‍यांना मदत करीत नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्याचे काम करावे. शासनही या स्तरावर काम करीत असून अनेक नाट्य परिषद शाखांना मदत करण्याची योजना आहे. येत्या काळात शासनातर्फे राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाट्य महोत्सव सुरु करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री व मध्यवर्ती नाट्य परिषदेचे विश्वस्थ उदय सामंत यांनी केले.

- Advertisement -

कालिदास कलामंदिर नाट्यगृहात अ. भा. नाट्य परिषद, नाशिक शाखेतर्फे वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार अशोक हांडे यांना, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना आणि बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकचे सदानंद जोशी यांना ना. उदय सामंत यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. शिरवाडकर व कानेटकर पुरस्कारांमध्ये 31 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्राचा समावेश होता तर बाबुराव सावंत पुरस्कार 15 हजार रुपये व स्मृतीचिन्हाचा समावेश होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय सामंत कोणत्याही पुरस्काराने कलाकारांचे महत्त्व आणि जबाबदारी वाढते. जब्बार पटेल, अशोक हांडे व सदानंद जोशी यांच्याकडून नवोदित कलाकारांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. त्यांनी साकारलेली नाटकांचे प्रयोग पुन्हा एकदा रंगमंचावर येण्याची गरज आहे. यासाठी ज्येष्ठ कलाकारांनी पुढे यावे. नाट्य परिषदा रंगकर्मींना उभारी देण्याचे काम करीत आहे, यांत शंका नाही. याचबरोबर शासनही आपल्या परीने नाट्य परिषदा बळकट करण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाट्य महोत्सव सुरु करीत आहे. यामुळे कलाकारांनी मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल.

सत्काराला उत्तर देतांना जब्बार पटेल यांनी त्यांच्या सुरुवातीपासूनच्या नाट्य प्रवासाचा आढावा घेतला. पु. ल. देशपांडे आणि प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखनाने प्रभावित होऊन डॉक्टर असूनही नाटकाकडे आकर्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. कलाकारांनी आपल्या कलेशी प्रामाणिक राहून काम केल्यास त्याचे चीज होते. अशोक हांडे म्हणाले, घरात वारकरी वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड लागली. घरी आई जात्यावर ओव्या गायची, त्यात्ाूनही लेखन साहित्याचे संस्कार मिळाले. लोकांच्या हृदयापर्यंत संहिता गेली पाहिजे, यावर कटाक्ष कायम ठेवला आणि त्यामुळेच माझ्या प्रत्येक कार्यक्रमांना रसिकांची दाद मिळत गेली. कुसुमाग्रजांच्या विशाखा काव्यसंग्रहाने लेखनाचे स्फूरण दिले, असेच म्हणावे लागले. सदानंद जोशी म्हणाले, की नाशिकमध्ये बाबुराव सावंत, मुकुंद कुलकर्णी, विवेक गरुड, सुनील देशपांडे यांच्यासोबत काम करीत असतांना मिळालेला अनुभव माझे नाट्यविश्व श्रीमंत करीत गेले. त्यात्ाून नाटकांतील भूमिकांचा आनंद मिळत गेला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला चारुदत्त दीक्षित यांच्या बागेश्री वाद्यवृंदातर्फे नांदी सादर झाली. सुनील ढगे यांनी प्रास्ताविक तर शिवाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नाट्य परिषद, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खेैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कार्यवाह अजित भुरे, खजिनदार सतीश लोटके, सदस्य नरेश गडेकर, संजय रहाटे, संजय दळवी, शिवाजी शिंदे तसेच विश्वास ठाकूर उपस्थित होते. यावेळी नाशिकच्या अडील या पारितोषिक प्राप्त एकांकिकेतील कलाकारांचा सतकार करण्यात आला. चारुदत्त दीक्षित यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या