अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासन, पोलीस दल, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य सेवा यासह विविध शासकीय विभागात अहिल्यानगर जिल्ह्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करताना दिसत आहेत. खरे तर पद कितीही मोठे असो, त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना सर्वप्रथम कुटुंबाला प्राधान्य देत नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागते. यामुळे घरीदारी, सरकारी दरबारी महिलाच कारभारी आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
दरवर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो, नारी सशक्तिकरण आणि समानतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरीला ओळखण्यासाठी समर्पित आहे. याशिवाय, हा दिवस महिलांचे हक आणि समानतेबद्दल जागरूकता वाढवण्याची विशेष संधी आहे. या खास दिवशी महिलांचा सन्मान करण्याची प्रथा आहे.
आज व्यावसायिक, वैयक्तिक, प्रशासकीय आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात महिला अग्रस्थानी आहेत. समाजाच्या नियमांना मोडून आजच्या महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, घर सांभाळत आहेत आणि वेळ पडलीच तर स्वतःची सुरक्षाही स्वतःच करत आहेत. आजच्या युगात महिला मुक्तपणे समाजात वावरू शकतात, त्यांना हवं ते करू शकतात आणि आपले मत मोकळेपणाने मांडताना दिसत आहेत. तसेच सरकारच्या विविध विभागात आपल्या कर्तव्यासोबत कामाचा ठसा उमटवताना पुरूषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत.
नगर जिल्ह्यात महसूल विभागात सध्या पाच उपजिल्हाधिकारी कार्यरत आहेत. यात जिल्हा पुरवठा विभागाची धुरा महिला अधिकाऱ्याकडे आहे. हा विभाग सर्वात संवेदनशील तेवढाच महत्त्वाचा आहे. यासह अन्य चार ठिकाणी महिला या समर्थपणे उपजिल्हाधिकारी पदावर काम करत आहेत. तालुक्यातील महत्वाचे आणि पद असणाऱ्या तहसीलदार पदावर पारनेर आणि श्रीगोंदा या ठिकाणी महिला आहेत. यासह गावपातळीवर सर्वात महत्त्वाचे आणि जोखीमेचे पद असणाऱ्या तलाठी या पदावर ३०० महिला समर्थपणे काम करत आहेत. नगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन महिलांना जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळालेली असून यात मेधा गाडगीळ आणि रुबल अग्रवाल या आयएएस अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
जिल्हा परिषद प्रशासनात प्राजक्ता लवंगारे आणि रुबल अग्रवाल या आयएएस अधिकाऱ्यांनी काम केलेले असून यासह पंचायत समिती पातळीवर श्रीगोंदा या ठिकाणी गटविकास अधिकारी तर पाथर्डीत सहायक गटविकास अधिकारी म्हणून महिला काम करत आहे. महिला बालकल्याण विभागाच्या तालुका पातळीवर असणाऱ्या महत्वाच्या पदांवर १५ ठिकाणी महिला असून जिल्ह्यात बहिण माझी लाडकी योजनेच्या यशाचे श्रेय जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक अंगणवाडी सेविकांना आहे.
गाव पातळीवर तलाठी यांच्या बरोबरीने ग्रामविकासाच्या सुविधा देण्याची जबाबदारी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी या पदावर आहे. या पदाच्या माध्यमातून २६३ ठिकाणी महिला कार्यरत असून गावगाडा हाकताना दिसत आहेत. नगर जिल्ह्यात सध्या २७हजारांहून अधिक महिला बचत कार्यरत असून यात ३ लाख १२ हजार महिला सक्रिय आहेत. यातील ७२ हजार महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांच्या पुढे नेण्यात यश आले आहे. या चळवळीची तालुका पातळीवर राबवण्याची जबाबदारी ९० महिला कर्मचाऱ्यांच्या जीवावर आहे.
महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग
अन्य शासकीय, निमशासकीय विभागात दुर्लक्षीत असणाऱ्या एसटी महामंडळात अलिकडच्या काही वर्षांत महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात अकोला, नेवासा आणि कोपरगाव याठिकाणी एसटीचे स्टेअरिंग तिघा महिलांच्या हाती आहे. या महिला एसटीच्या चालक म्हणून काम करत आहेत. यासह १९७ महिला एसटी वाहक सेवेत असून त्या ग्रामीण भागात अहोरात्र सेवा बजावताना दिसत आहेत. एसटी महामंडळाच्या विविध वर्कशापमध्ये २६ महिला थेट एसटी वाहने दुरूस्त करत असून नगरच्या तारकपूर आगारात महिला कर्मचारी बसस्थानकाचे कंट्रोल करताना दिसत आहेत. यासह एसटी महामंडळाच्या प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे.
पोलीस दलात ५९० रणरागिनी
कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासह जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी, महिला अंमलदार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. सध्या जिल्हा पोलीस दलात ५७२ महिला अंमलदार व १८ पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये १ पोलीस निरीक्षक, ५ सहायक पोलीस निरीक्षक व १२ पोलीस उपनिरीक्षक आहेत. यापूर्वी जिल्ह्यात ज्योतीप्रिया सिंग यांनी नगर ग्रामीण उपविभागात सहायक पोलीस अधीक्षक, प्रांजली सोनवणे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक तर पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून यशस्वी जबाबदारी संभाळली आहे. जिल्हा पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस ठाण्यासह अकार्यकारी विभागात काम करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्या निभावत आहेत. खऱ्याअर्थाने कुटुंब आणि कर्तव्य अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या या रणरागिनी आहेत.
४६ महिलांच्या हाती सार्वजनिक आरोग्य
शासकीय आरोग्य सेवेची ग्रामीण भागातील धूरा सांभाळण्याचे काम देखील महिला करताना दिसत आहेत. यात राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी पदासोबतच ४६ ठिकाणी शासकीय आरोग्य संस्थेतून महिला वैद्यकीय अधिकारी आरोग्याच्या सार्वजनिक सेवा देत आहेत. यासह जिल्हा वैद्यकीय प्रशिक्षण केंद्राचे नेतृत्व महिलेच्या हाती आहे. गाव पातळीवर २ हजार ७०० आशा सेविका अन्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून शासकीय आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देताना दिसत आहेत.
पहिल्यांदा महिला प्रधान न्यायाधीश
नगर जिल्ह्याच्या २०० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अंजू शेंडे यांच्या रूपाने नगर जिल्ह्याला जिल्हा प्रधान न्यायाधीश मिळालेल्या आहेत. यापूर्वी अन्य पदावर महिला न्यायाधीश होत्या. पण न्या. शेंडे या पहिल्या जिल्हा प्राधान न्यायाधीश ठरल्या आहेत.
पाच हजार महिला प्राथमिक शिक्षिका
नगर जिल्ह्यात सध्या १० हजार ८९२ प्राथमिक शिक्षक कार्यरत असून यात ५ हजार ते ५ हजार ५०० महिला शिक्षक कार्यरत आहेत. या महिला शिक्षकांच्या खांद्यावर जिल्ह्यातील शासकीय शाळांमधील प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी आहे. यातील अनेक शिक्षिका या मुख्याध्यापक, केंद्र ते विस्तार अधिकारी आहेत. नगर जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात ३ उपशिक्षणाधिकारी असून यापूर्वी दोघा महिलांनी शिक्षणाधिकारी पदाची धुरा संभाळलेली आहे.
थेट बांधावर जाणारी कृषी सेविका
जिल्हा कृषी विभागात देखील महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. याठिकाणी विविध महत्वाच्या पदांवर महिला कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत. यात ५ जिल्हा कृषी अधिकारी, ५ उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यासह तालुकास्तरावरील कृषी अधिकारी ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचणाऱ्या १८८ कृषी सहाय्यक महिला यांचा समावेश आहे.
राजकारणातही महिला सक्रिय
जिल्ह्यात सध्या आमदार म्हणून मोनिकाताई राजळे कार्यरत असून यापूर्वी कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलताई कोल्हे यांनी आमदार म्हणून काम पाहिलेले आहे. शालिनीताई विखे पाटील, राजश्रीताई घुले, मंजुषा गुंड, विमल डेरे यांनी पंचायतराजमधील सर्वोच्च संस्था असणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. यासह जिल्हा परिषद सभापतिपद, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी अनेक महिलांना मिळालेली असून त्यांनी यशस्वी काम केलेले आहे