अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पॅलेस्टाईनला निघालेला नगरमधील युवक कोणाच्या संपर्कात होता, याची माहिती पोलिसांसह विविध गुप्तचर यंत्रणा घेत आहेत. यासाठी या युवकाचे फेसबुक, इंस्टाग्राम खाते तपासले जात आहे. या युवकाच्या मोबाईलमध्ये पॅलेस्टिनींवर होत असलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ आढळून आले आहेत.
शहरातील मनमाड रस्त्यावरील उपनगरात राहणारा 20 वर्षीय युवक 2 ऑगस्टला बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी तोफखाना पोलिसांकडे केली होती. हा युवक शहरातील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या नगरमधील मित्राला तो पॅलेस्टाईनला निघाल्याची माहिती मिळाल्याने पोलीस, नातेवाईक व मित्राने मुंबईत जाऊन त्याला नगरमध्ये आणले. आता पोलिसांसह विविध गुप्तचर यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक त्याची चौकशी करत आहेत. अजूनही या युवकाला घरी सोडण्यात आलेले नाही. हा युवक नगरमधून मुंबईत हाजी अली येथे तेथून मोहम्मद अली रोडला व तेथून करम लॉजमध्ये मुक्कामाला राहिला. त्याची तिथे दोन कश्मीरी युवकांसमवेत ओळखही झाली. हे दोघे कश्मीरी युवक पॅलेस्टाईनला निघाले होते, असेही या युवकाच्या माहितीतून आढळले आहे.
इस्राइल- पॅलेस्टाईन यांच्यामधील अलीकडच्या काळात झालेल्या संघर्षाचे व्हिडीओ युवकाच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत. त्यामध्ये पॅलेस्टाईन युवकांवर, विशेषतः लहान मुलांवर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली जात होती.
दरम्यान, युवकाला मुंबईत येण्यास कोणी सांगितले, तो दिल्लीला कोणाच्या सांगण्यावरून जाणार होता, त्याच्या संपर्कात कोण होते? याची माहिती पोलीस घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्याचे विविध समाजमाध्यमावरील माहिती, संपर्क जमा केले जात आहेत. या संदर्भात अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.
पॅलेस्टिनींसाठी शहीद होण्याची मानसिकता
हा युवक मुंबईत गेल्यानंतर त्याने त्याच्याकडील सिमकार्ड तोडून टाकून व हॉटेलमधील ‘वायफाय’च्या आधारे तो इतरांशी संपर्क करत होता. मुंबईतून तो नंतर दिल्लीत जाणार होता. पॅलेस्टिनींसाठी शहीद होण्याची त्याची मानसिकता झाली होती, असे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता आढळले. त्याच्याकडील पैसे संपल्याने त्याने नगरमधील मित्राशी संपर्क केला. हा मित्र शहरातीलच एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. मित्राला माहिती मिळाल्यानंतर तो सतर्क झाला व त्यानेच कुटुंबियांना याबाबत सावध केले.