Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजWorld Economic Forum - 2026 : महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार...

World Economic Forum – 2026 : महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

जागतिक आर्थिक परिषदेची दावोसमधील वार्षिक बैठक यंदा महाराष्ट्रासाठी अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त ७ ते १० लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत प्राथमिक बोलणी झाली असून हे करारही येत्या एक-दोन महिन्यात प्रत्यक्षात उतरणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. मुंबईला येत्या काळात आपण सर्क्युलर इकॉनॉमीचे शहर करणार असून त्यामुळे मुंबईतील घनकचरा आणि सांडपाण्याचे रूपांतर संपत्तीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ दावोस दौऱ्यात सहभागी झाले आहे. १७ जानेवारीपासून सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत आर्थिक गुंतवणुकीबाबत राज्य सरकारने विविध आंतराराष्ट्रीय उद्योग समूहांशी सामंजस्य करार केले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज दावोस येथून झूमच्या माध्यमातून मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्योग, सेवा, शेती अशा सर्वच क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे. यातील ८३ टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

YouTube video player

कोकणात १६ टक्के, मुंबई महानगरात २२ टक्के तर विदर्भात १३ टक्के गुंतवणूक आली आहे. ५० टक्के गुंतवणूक राज्याच्या इतर भागात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, नंदूरबार, धुळे या भागात ५० हजार कोटींची गुंतवणूक होईल. मराठवाडयाचे मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर असून तिथे ५५ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. नागपूर विभाग तसेच विदर्भात २ लाख ७० हजार कोटी गुंतवणूक आली आहे. कोकणात ३ लाख ५० हजार कोटी गुंतवणूक येणार आहे. रायगड हे नवीन मॅग्नेट तर आहेच पण रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही चांगली गुंतवणूक होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

आपण नवीन तिसरी मुंबई तयार करतो आहोत. त्यात रायगड पेण ग्रोथ सेंटर घोषित केले आहे. यात सार्वजनिक-खासगी भागीदारी आहे. जसा बीकेसी तयार केला तसा बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून रायगड पेण स्मार्ट सिटी असेल. नवी मुंबई विमानतळापासून याला कनेक्टिव्हिटी असेल. अर्थव्यवस्था जर दुप्पट वेगाने मोठी करायची असेल तर इनोव्हेशन इकोसिस्टिम उभी करावी लागते. इनोव्हेशन सिटी त्यासाठी उभारावी लागेल. तिसरी मुंबई हे त्याचे उत्तर आहे. टाटा सन्स तिथे ११ बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. भविष्यातले शहर म्हणून हे शहर ओळखले जाईल, असा विश्वास फडणवीस म्हणाले.

मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी
मुंबईमध्ये येत्या काळात सर्क्युलर इकॉनॉमी उभारणार आहोत. मुंबईतील पाणी, हवेची शुद्धता वाढली पाहिजे. त्यासाठी वेस्ट हे वेल्थमध्ये रूपांतरित झाले पाहिजे. मुंबई महापालिका त्यासाठी पुढाकार घेऊन तर काम करेलच, पण त्यात खासगी क्षेत्रातूनही गुंतवणूक येईल. हाच प्रयोग पुणे,नागपूरसारख्या शहरातही राबविण्यात येईल. यामुळे मुंबईसह इतर शहरांचा चेहरामोहराच बदलून जाईल, असा दावा फडणवीस यांनी केला.

यश पाहवत नसलेल्यांचे पेड टूलकिट
इथल्याच कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार केले, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. त्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, ज्यांना महाराष्ट्राचे यश पाहवत नाही ते अशा टूलकिटच्या माध्यमातून टीका करत आहेत. समाज माध्यमात तर पेड टीका करण्यात येत आहे. पैसे देऊन अशा प्रकारे टीका करणाऱ्यांची मी नोंद घेतली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये का करार केला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अभिषेक लोढा हे देशातील प्रथितयश उद्योगपती आहेत. त्यांनी केलेल्या करारांमुळे महाराष्ट्राला फायदा होणार आहे. जगातील चार मोठ्या कंपन्या डेटासेंटरमध्ये गुंतवणूक करत आहेत. डेटासेंटर गुंतवणुकीत मुंबई त्यामुळे पहिल्या क्रमांकावर येईल. यात ८० टक्के परदेशी गुंतवणूक आहे. २०२१ मध्ये आलेल्यांनी ७० ते ८० हजार कोटींचे करार केले होते. आता ३० लाख कोटींचे करार झाले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

मुंबईत आल्यानंतर तिथले करार
सध्या मी महाराष्ट्राच्या औद्योगिक गुंतवणुकीच्या करारात व्यस्त आहे. मुंबईत आल्यानंतर तिथले करार पाहणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. त्यामुळे फडणवीस दावोस दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर महापौर निवडणुकीच्या निवडीला वेग येणार आहे.

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...