शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
गुंतवणूक केलेल्या पैशावर जादा मासिक परतावा देतो म्हणून पती-पत्नीचा विश्वास संपादन करून ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीचे शिर्डीचे चालक भूपेंद्र राजाराम सावळे पाटील यांच्यासह पाच आरोपींनी मिळून आर्थिक फसवणूक केली, अशी फिर्याद राहाता शहरातील शितल गोरखनाथ पवार (वय 33 ) यांनी राहाता पोलिसात दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भूपेंद्र पाटील शिर्डी परीसरातून कोट्यावधी रुपये घेवून पसार झाल्याची चर्चा आहे.
फिर्यादी शितल पवार रा. राहाता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 5 ऑगस्ट 2024 रोजी नातेवाईक आजारी असल्याने साईबाबा रुग्णालय येथे त्यांना भेटण्यास गेले असता, त्या ठिकाणी श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी राजाराम भटू सावळे व त्यांचा मुलगा भूपेंद्र राजाराम सावळे हे तेथील काही लोकांना ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स नावाची कंपनी चालवत असल्याबद्दल माहिती देत होते. त्यांनी सांगितले की गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळतो. त्यांनी माझे पती गोरखनाथ पवार यांचा मोबाईल नंबर घेतला आणि सांगितले की तुम्ही गणेशवाडी शिर्डी येथे आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये या. त्यांच्या सांगितल्यावरून आम्ही तेथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या कंपनीबद्दल माहिती दिली व चांगला परतावा देण्याकरता विश्वास देऊन आमचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तीन दिवसांनी भूपेंद्र राजाराम सावळे, भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदीप सावळे, सुबोध सावळे, आणि राजाराम भटू सावळे, सर्व राहणार शिर्डी, यांनी माझे पती गोरखनाथ यांना नवनाथ मंदिर, राहाता येथे आल्याचे सांगून त्यांना फोन करून तेथे बोलावून घेतले.
तेथे माझे पती यांना शिर्डी व राहाता परिसरातील अनेक लोकांचे पैसे त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केल्याची आणि त्यांना चांगला परतावा दिल्याची कागदपत्रे दाखवून आम्हाला त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आग्रह केला. त्यावरून आम्ही घरी विचारविनिमय करून दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी माझ्या राहाता येथील बंधन बँकेच्या खात्यातून ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या शिर्डी येथील अॅक्सिस बँकेच्या खात्यावर 3 लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठवले. त्यावरून वरील लोकांनी सदर बाबत मला कंपनीचा करारनामा करून दिला. त्यानंतर 3 लाख रुपयांच्या ठेवीवर मला दर महिन्याला 78 हजार रुपये असे पाच वेळा परतावा स्वरूपात कंपनीच्या माध्यमातून जमा करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे बोलण्यावर माझा विश्वास अधिक दृढ झाला. दि. 10 डिसेंबर 2024 रोजी ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीचे वरील चालकांनी शिर्डी येथील हॉटेल केब्रीज ग्रँड येथे स्नेहमेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यात आम्हाला सांगितले की तुम्ही अजून आमच्या कंपनीत अधिक रक्कम गुंतवणूक करा व अधिक परतावा मिळवा, असे प्रोत्साहित केल्याने आम्ही वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन हात उसने पैसे घेऊन एका वर्षाकरिता 5 लाख रुपये गुंतवले. दर महिन्याला 60 हजार रुपये परतावा मिळणार आणि एक वर्षानंतर गुंतवलेले 5 लाख रुपये चेकने परत मिळणार, या बोलीवर 23 डिसेंबर 2024 रोजी आम्ही त्यांच्या कंपनीच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यावर बंधन बँकेच्या खात्यातून आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे 28 जानेवारी 2025 रोजी 60 हजार रुपये महिन्याप्रमाणे एक महिन्याची रक्कम मला माझ्या बंधन बँकेच्या खात्यावर जमा झाली. त्यानंतर, पहिले 3 लाख रुपये गुंतवणूक केलेल्या रकमेवरील परताव्याचा हप्ता वेळेत जमा न झाल्याने मी कंपनी चालक संदीप सावळे यांना फोन करून मासिक परतावा तसेच 5 लाख रुपये गुंतवणुकीच्या चेकबाबत विचारणा केली.
त्याने तांत्रिक अडचण आली असून नंतर तुमचे पैसे जमा होईल, असे सांगून टाळाटाळ केली. त्यानंतर मी आणि माझा पती असे आम्ही वरील कंपनी चालकांकडे मासिक परताबाबत वेळोवेळी फोन करून विचारणा केली असता, त्यांनी आम्हाला आजारपणाचे कारण सांगून आज देतो, उद्या देतो असे सांगून टाळाटाळ केली. त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर बंद केल्याने, मी आणि माझा पती असे आम्ही त्यांच्या गणेशवाडी, शिर्डी येथील कार्यालयावर जाऊन पाहिले असता, ते बंद होते. तसेच, त्यांच्या घरी गेलो असता, ते त्यांच्या कुटुंबासह पसार झाल्याचे दिसले.
माझ्या पतीने इतर कंपनीचे सदस्य यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी देखील फोन उचलत नसल्याचे सांगितल्याने मला समजले की माझी फसवणूक झाली आहे. अशा प्रकारची फिर्याद शितल गोरक्षनाथ पवार यांनी राहाता पोलिसात दिली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे. संबंधित आरोपीविरुद्ध इतरही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत.




