शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
एका संस्थेच्या नावाखाली गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणार्या संदीप सुधाकर थोरात याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत गोरख सीताराम वाघमारे (वय 63, रा.शेवगाव) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी (4 मार्च) रात्री उशिरा फिर्याद दिली.
क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा.लि. या संस्थेच्या नावाखाली गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर पैसे न देता गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या संस्थेचा अध्यक्ष संदीप सुधाकर थोरातसह 6 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संदीप थोरातसह दिलीप तात्याभाऊ कोरडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा.लि. या संस्थेचा अध्यक्ष संदीप सुधाकर थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल सिताराम खरात, दीपक रावसाहेब कराळे, दिलीप तात्याभाऊ कोरडे, नवनाथ सुभाष लांडगे, सचिन सुधाकर शेलार (सर्व रा. अहिल्यानगर) यांनी संगनमताने आखेगाव रस्ता, वरूर चौफुली, शेवगाव येथे संस्थेचे कार्यालय सुरू केले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी संशयित आरोपींनी विविध क्लृप्त्या लढविल्या. गुंतवणूकदारांना ठेवींवर 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषापोटी फिर्यादी गोरख वाघमारे यांनी 23 लाख 100 रुपयांची गुंतवणूक या संस्थेत केली. त्यांच्या प्रमाणेच इतर अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपये या संस्थेत गुंतविले. मात्र त्यांना परतावा देण्यास टाळाटाळ सुरू करण्यात आली. वाघमारे यांनी याबाबत अनेकदा पाठपुरावा करून पैशांची मागणी केली. मात्र त्यांना प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगण्यात आली.
गुंतविलेले पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीची चौकशी होऊन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गोरख वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप सुधाकर थोरातसह 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर शेवगाव पोलिसांचे पथक बुधवारी (5 मार्च) दुपारी नगरमध्ये दाखल झाले. या पथकाने संदीप थोरात सह दिलीप कोरडे या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती शेवगावचे पो.नि. समाधान नागरे यांनी दिली.
विविध कंपन्यांच्या नावे अनेकांना चुना
दरम्यान, संदीप थोरात याच्याविरूध्द करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईमुळे त्याने फसवणूक केलेल्या अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनी स्थापन करून जाहिरातबाजी करुन लोकांना भुलविण्याचं काम संदीप थोरात याने केले. याशिवाय अनेक कंपन्या काढून त्याने अनेकांना चुना लावलेला आहे.