Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगग्रंथालयांचा सहभाग

ग्रंथालयांचा सहभाग

मराठी भाषेची समृद्धता आणि संवर्धनात ग्रंथालयांची भूमिका फार मोलाची आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन ‘ग्रंथालय’ समृद्ध होणे गरजेचे आहे. वाचनामुळे लेखन कौशल्य मुलांना अवगत होते. ग्रंथालयामार्फत शालेय जीवनामध्ये चालवल्या जाणार्‍या वाचन चळवळीमुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल होतात. त्यांची भाषाशैली व वैचारीक परिपक्वता सुधारते. ग्रंथालय चळवळ समृद्ध करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.

प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे. आज जगामध्ये दोन हजारहून अधिक भाषा अस्तित्वात असून यापैकी बर्‍याच भाषांनी ज्ञान निर्मितीसाठी भरीव योगदान दिलेले आहे. मराठी भाषा यापैकी एक आहे. मराठी भाषेचे संवर्धन हजारो वर्षांपासून संत ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी अशा महान व्यक्तींकडून केले गेले आहे. ती परंपरा अखंडित आजही सुरू आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा हे ग्रंथ आपणा सर्वांनाच माहिती आहेत.

मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन वाढले पाहिजे. विद्यालयांमध्ये ग्रंथालयांची संख्या वाढली पाहिजे. त्यामधील ग्रंथसंपदादेखील समृद्ध झाली पाहिजे. समाज माध्यमांवरील वाचन आणि प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन केलेले वाचन यामध्ये खूप फरक आहे. तो सर्वांनी समजून घेतला पाहिजे. मुलांमधील अवांतर वाचन ज्यावेळेस वाढेल त्याचवेळेस मराठी भाषा टिकेल. यासाठी शाळा, महाविद्यालय, ग्रामीण भागामध्ये ‘ग्रंथालय चळवळ’ उभी राहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये ‘भिल्लार’सारखे पुस्तकांचे गाव तयार होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागामध्ये मराठी भाषा समृद्ध होणार नाही. मुलांमध्ये वाचनाचे संस्कार हे बालवयातच होतात. या वयामध्ये मुलांच्या हाती गोष्टींची दर्जेदार पुस्तके पडल्यावर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होते.

- Advertisement -

मराठी भाषा समृद्ध होण्याकरता प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन ‘ग्रंथालय’ समृद्ध होणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून मुलांमध्ये भाषा वृद्धिंगत होते. ग्रंथालयामध्ये मुलांमध्ये ‘वाचन गु्रप’ स्थापन करून मुलांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून वाचनाची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. सह्याद्री विद्यालय, संगमनेर येथे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याकरता इयत्ता पाचवी ते 10 वीपर्यंत मुलांचे वाचन समूह सुरू केले आहेत. एका वाचन गटामध्ये चार ते आठ मुलांचा सहभाग असतो. एका मुलाला वाचन करायचे असेल तर तो आठ वाचक तयार करत असतो. मुलांचे मुलांमध्ये सामंजस्य चांगले असल्याने ते सहज तयार करतात. असे साधारणत: 150 ते 200 वाचन समूह तयार झाले आहेत.

सुरुवातीला मुलांना गोष्टींची छोटी-छोटी पुस्तके दिली जातात. एकदम मोठी पुस्तके दिली जात नाहीत. छोट्या छोट्या पुस्तकांच्या माध्यमातून मुलांना पुस्तकांची-वाचनाची आवड निर्माण होते. हळूहळू मुले मोठ्या पुस्तकाकडे वळू लागतात. वाचनाची आवड निर्माण झाल्यावर मुले टिप्पणी काढू लागतात. ग्रंथालयासाठी स्वतंत्र अशा वह्या आहेत. यामध्ये वाचलेल्या पुस्तकाबद्दलची मते लिहून काढतात. वर्षभरामध्ये मुलांनी वाचलेल्या पुस्तकाच्या नोंदी असतात. वर्षाच्या शेवटी या वह्या जमा करून यामध्ये ‘उत्कृष्ट वाचक’ निवडला जातो. वाचनामुळे लिखाणाची आवडही निर्माण होते. याचा फायदा मुलांना निबंध लेखन पत्रलेखन यासाठी चांगला होतो. लेखन कौशल्य मुलांना अवगत होते.

पुस्तके वाचता वाचता मुलांनादेखील वाटू लागते की आपणही लेखक व्हावे. पुस्तके लिहावीत. याच शाळेत नववीत असणारा भूपात्र शेळके या विद्यार्थ्याने तर इतिहासातील एका पात्रावर पुस्तक लिहण्यास सुरुवात केली आहे. वाचनामुळे लिखाणाची आवड तर लागतेच परंतु भाषाशैलीमध्येही बदल होतो. मुले पुस्तकांवर छान बोलू लागतात व आपले विचार प्रकटपणे मांडू लागतात. कथन स्पर्धेमध्ये मुले वाचलेल्या पुस्तकावर कथन करतात. पुस्तक वाचताना आलेले अनुभव एकमेकांना सांगतात. यामुळे इतर मुलांनादेखील प्रेरणा मिळते. मुलांमध्ये व्यासपीठावर बोलण्याची भीती दूर होते. मराठी भाषेचे उच्चार स्पष्ट होतात. ग्रंथालयामार्फत शालेय जीवनामध्ये चालवल्या जाणार्‍या वाचन चळवळीमुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल होतात. त्यांची भाषाशैली व वैचारीक परिपक्वता सुधारते.

मराठी भाषेला जागतिक स्तरापर्यंत घेऊन जावयाचे असेल तर ग्रंथालयांची भूमिकादेखील तेवढीच महत्त्वाची असेल. ग्रंथालयामार्फत ‘वाचन चळवळ’ मोठी करून तसेच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून उदा. पुस्तक प्रदर्शन, वादविवाद स्पर्धा, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा इ. माध्यमातून ही चळवळ पुढे घेऊन जाऊ शकतो व मराठी भाषा ही वृद्धिंगत होऊ शकते.

(लेखक प्रयोगशील ग्रंथपाल आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या