चेन्नई । Chennai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये शुक्रवारी २४ मे २०२४ रोजी दुसरा क्वालिफायर सामना चेन्नई येथील एम ए चिदंबरम क्रीकेट स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता सनरायझर्स हैदराबाद विरूध्द राजस्थान रॉयल्स संघामध्ये खेळविण्यात येणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरूध्द ८ गडी राखून दणदणीत विजय संपादन करून कोलकाता नाईट रायडर्स संघाने अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित केला आहे.
मात्र अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद सज्ज असणार आहेत. तर पराभूत संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाची धुरा सांभाळणार आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा पॅट कमिन्स कडे असणार आहे.आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये १९ सामने खेळविण्यात आले आहेत. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास सनरायझर्स हैदराबाद संघाचे पारडे जड राहिले आहे. हैदराबाद संघाने १० तर राजस्थान रॉयल्स ९ सामन्यात विजयी झाला आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सतराव्या हंगामाच्या दुसऱ्या टप्यात सलग चार सामन्यात पराभव झालेल्या राजस्थान रॉयल्स विजयी मार्गावर परतला आहे. आता हैदराबाद विरूध्द विजयी लय कायम राखण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज असणार आहे. तर पहिल्या क्वालिफायर सामन्यातील पराभव विसरून नव्या उमेदीने मैदानावर उतरण्यासाठी हैदराबाद प्रयत्न करणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये दोन्ही संघामध्ये एकमेव साखळी सामना हैदराबाद येथे खेळविण्यात आला होता. या सामन्यात हैदराबाद संघाने विजय संपादन केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.