मुंबई | Mumbai
आयपीएल २०२५ (IPL 2025) क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. स्पर्धेमध्ये ५७ सामने पूर्ण झाले असून, भारत पाकिस्तान (India vs Pakistan) मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ही स्पर्धा १ आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे् बरेच परदेशी खेळाडू हे मायदेशी परतले होते. त्यानंतर आता या शनिवारपासून आयपीएलच्या स्पर्धेला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होणार आहे. मात्र, यातील काही खेळाडूंनी आयपीएलचे उर्वरित सामने खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला आहे. यामुळे आयपीएलमधील संघांना मोठा धक्का बसला आहे.
तर काही खेळाडू पुन्हा भारतामध्ये (India) येणार आहेत. ज्या खेळाडूंनी (Players) भारतात येण्यास नकार दिला आहे, त्यामध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स,सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, यासह आणखी काही संघांचा समावेश आहे. या खेळाडूंमुळे सर्वात जास्त धक्का हा मुंबईच्या संघाला बसलेला आहे. कारण मुंबईचे सर्वाधिक दोन खेळाडू हे पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी मुंबईच्या संघात परतणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात क्विंटन डीकॉकच्या जागी यष्टीरक्षक आणि सलामीवीर या जागेवर रियान रिक्लेटनची निवड करण्यात आली होती. या हंगामात रियानने दमदार कामगिरी केली होती. रियानने यष्टीरक्षणात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता तो पुन्हा संघात येणार नाही. त्याचबरोबर मुंबईचा दुसरा मॅचविनर खेळाडू कॉर्बिन बॉशही देखील यावेळी पुन्हा खेळण्यासाठी भारतामध्ये येणार नाही. त्यामुळे मुंबईच्या संघाला हे दोन मोठे धक्के मानले जात आहे.
तसेच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचविण्यात शुभमन गिल, जाॅस बटलर आणि साई सुदर्शन ने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.मात्र, आता बाद फेरीच्या निर्णायक टप्प्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर मायदेशी परतणार आहे. २९ मे पासून वेस्ट इंडिज विरूध्द खेळविण्यात येणाऱ्या द्विपक्षीय मालिकेत तो इंग्लंड संघांमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे आता त्याच्याजागी श्रीलंकेचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज कुशल मेंडिस बाद फेरीत गुजरात टायटन्स कडून खेळण्याची शक्यता आहे.
तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal Challengers Bangalore) संघाचा घातक गोलंदाज जॉश हेझलवूड भारतात लवकरच परतणार असल्याने बंगळूरु संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.सुरुवातीला जॉश हेझलवूडच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. बाद फेरीच्या जवळ असलेल्या बंगळूरु संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज जॅक फ्रेजर मॅगगर्कने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे बदली खेळाडू म्हणून मुस्तफिझूर रहेमानला संधी देण्यात आली आहे.