मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना दुपारी ३.३० वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल (Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना सायंकाळी ७.३० वाजता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात खेळविला जाणार आहे.
पहिल्या सामन्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धुरा रजत पाटीदारकडे तर संजू सॅमसनकडे (Rajat Patidar and Sanju Samson) राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत ३२ सामने खेळविण्यात आले आहेत. यात बंगळूरुने १५ आणि राजस्थान रॉयल्सने १४ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर ३ सामने रद्द करण्यात आले आहेत. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास बंगळूरु संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. राजस्थान रॉयल्स संघाच्या खात्यात ५ सामन्यात ४ गुण जमा असून, विजयी हॅट्रिक करण्याच्या इराद्याने राजस्थान रॉयल्स मैदानावर उतरणार आहे. तर दुसरीकडे बंगळुरू संघाच्या खात्यात ५ सामन्यात ३ विजय आणि २ पराभवांसह ६ गुण जमा असून, विजयी चौकार मारण्यासाठी बंगळूरु सज्ज असणार आहे.
तसेच दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आणि दिल्ली कॅपिटल्सची धुरा अक्षर पटेलकडे (Hardik Pandya and Axar Patel ) असणार आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत करून आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अडखळती झाली आहे. मुंबई इंडियन्स संघाला चेन्नई सुपरकिंग्ज, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान, उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला ९ सामन्यात किमान ७ विजय संपादन करावे लागणार आहेत. एवढेच नव्हे तर आपला नेट रनरेट देखील अधिक चांगला करावा लागणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स आपली विजयी लय कायम राखण्यासाठी सज्ज असणार आहे. तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३५ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास मुंबई इंडियन्सने १९ तर दिल्ली कॅपिटल्सने १६ सामन्यात विजय संपादन केला आहे. नवी दिल्ली (New Delhi) येथील अरुण जेटली स्टेडियमवर १२ सामने खेळविण्यात आले आहेत. यात दिल्ली कॅपिटल्सने ७ तर मुंबई इंडियन्सने ५ सामने जिंकले आहेत.