मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals) संघाशी होणार आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा अष्टपैलू अक्षर पटेलकडे तर पॅट कमिन्सकडे सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खात्यात १० सामन्यात ६ विजय ४ पराभवांसह १२ गुण जमा असून, उपांत्य फेरीत (Semi Finals) आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला किमान २ विजय आवश्यक आहेत.आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये २५ सामने खेळविण्यात आले असून, सनरायझर्स हैदराबाद ने १३ तर दिल्ली कॅपिटल्स ने १२ सामन्यात विजय संपादन केला आहे.
तसेच हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर (Rajiv Gandhi Cricket Stadium) झालेल्या ६ सामन्यात दोन्ही संघांनी ३-३ विजय संपादन केले आहेत. तर दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास दिल्ली कॅपिटल्सने ३ तर सनरायझर्स हैदराबादने २ सामने (Match) जिंकले आहेत.