मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (मंगळवारी) गुजरात टायटन्स विरूध्द मुंबई इंडियन्स संघांमध्ये वानखेडे स्टेडियमवर सामना खेळविण्यात येणार आहे.या सामन्यात गुजरात टायटन्सचे कर्णधारपद शुभमन गिलकडे (Shubhman Gill) तर मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) असणार आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या खात्यात ११ सामन्यात ७ विजय आणि ४ पराभवांसह १४ गुण जमा असून, सरस नेट रनरेटमुळे मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्स संघाच्या खात्यात १० सामन्यात ७ विजय आणि ३ पराभवांसह १४ गुण जमा असून, गुजरात टायटन्स १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना अजून १ विजय आवश्यक आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात विजय संपादन केला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्स (RR) विरूध्द १०० धावांनी दणदणीत विजय (Win) संपादन केला आहे.
दुसरीकडे गुजरात टायटन्सने आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरूध्द ३८ धावांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे अव्वल दोन स्थानात आपला प्रवेश निश्चित करण्याची संधी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सकडे असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ६ सामने खेळविण्यात आले असून, गुजरात टायटन्सने ४ तर मुंबई इंडियन्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.
दरम्यान, मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये एकमेव सामना खेळविण्यात आला असून, मुंबई इंडियन्सने त्यात विजय संपादन केला आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दुसऱ्यांदा सामना खेळविण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने ३६ धावांनी विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे असणार आहे.