मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Mumbai Indians and Royal Challengers Bangalore) आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली खेळताना आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दमदार सुरुवात केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या घरच्या मैदानावर विजय संपादन करून इतिहास रचला आहे. मात्र, गुजरात टायटन्स विरूध्द बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बंगळूरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा पराभव विसरून विजयी मार्गावर परतण्यासाठी आणि आयपीएल स्पर्धेमध्ये आपला दबदबा मजबूत करण्यासाठी बंगळूरु संघाकडे संधी असणार आहे.
दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. मुंबई इंडियन्सने ४ सामने खेळले असून, कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द एकमेव विजय संपादन केला आहे. मात्र, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स विरूध्द त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे पराभवाचा चौकार टाळण्यासाठी मुंबई इंडियन्स प्रयत्न असणार आहे.
दरम्यान, आयपीएलच्या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये ३३ सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्सने १९ तर बंगळूरुने १४ सामन्यात विजय (Win) संपादन केला आहे. तर वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये (Teams) ११ सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्सने ८ तसेच बंगळूरुने ३ सामन्यात विजय संपादन केला आहे.
जसप्रीत बुमराह आजचा सामना खेळणार?
मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईच्या संघात वापसी झाली आहे. त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला मुकावे लागले होते. तसेच आयपीएलमधील चार सामन्यांतही खेळता आले नव्हते. मात्र, आता बुमराह परतल्याने प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. तसेच बुमराह आजचा सामना खेळणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.