मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स संघाचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians and Rajasthan Royals) संघाशी होणार आहे. हा सामना जयपूर (Jaypur) येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या ५ सामन्यात १ विजय आणि ४ पराभवांसह गुणतालिकेत नववे स्थान निश्चित केले होते. मात्र, मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सलग ५ विजय संपादन करून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश जवळपास निश्चित करण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्स मैदानावर उतरणार आहे.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूध्द जयपूर येथे खेळविण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय संपादन करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे. त्यामुळे सलग दुसरा विजय संपादन करून विजेतेपदाचा चौकार मारण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज असणार आहे.विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्स संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसनच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद रियान परागकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३० सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्सने १६ राजस्थान रॉयल्सने १४ सामन्यात बाजी मारली आहे.तर १ सामना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर ८ सामने खेळविण्यात आले असून, राजस्थान रॉयल्सने ६ तर मुंबई इंडियन्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.