चेन्नई । Chennai
इंडियन्स प्रीमियर लीग (IPL 2026) च्या १९ व्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, प्रत्येक सामन्यासोबत प्लेऑफचे समीकरण कमालीचे रंगतदार होत आहे. आज (दि. १८ मे) चेन्नईच्या ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर गुणतालिकेतील दोन बलाढ्य संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात ६३ वा महामुकाबला रंगणार आहे. हा सामना केवळ एक स्पर्धा नसून दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ अशी परिस्थिती निर्माण करणारा ठरणार आहे.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ससाठी आजचा सामना अस्तित्वाची लढाई आहे. आज पराभव झाल्यास चेन्नईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात येईल. दुसरीकडे, पॅट कमिन्सचा सनरायझर्स हैदराबाद संघ आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये अधिकृतपणे पात्र ठरणारा दुसरा संघ बनण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार यात शंका नाही.
चेपॉकचे मैदान ऐतिहासिकदृष्ट्या फिरकीपटूंसाठी नंदनवन मानले जायचे. मात्र, गेल्या काही सामन्यांत येथील खेळपट्टी फलंदाजीसाठीही पोषक ठरत आहे. चालू हंगामात येथे झालेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांत पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे आज नाणेफेक (टॉस) जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीला पसंती देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आकडेवारीनुसार, या मैदानावर खेळल्या गेलेल्या ९७ सामन्यांपैकी ५० सामने पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
दोन्ही संघांमधील आजवरचा इतिहास पाहिला तर चेन्नई सुपर किंग्सचे पारडे स्पष्टपणे जड दिसते. आयपीएल इतिहासात आतापर्यंत हे दोन्ही संघ २३ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी तब्बल १५ सामन्यांत चेन्नईने बाजी मारली आहे, तर सनरायझर्स हैदराबादला केवळ ८ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. मात्र, हैदराबादचा सध्याचा फॉर्म पाहता चेन्नईला त्यांना रोखण्यासाठी विशेष रणनीती आखावी लागेल.
दोन्ही संघांची संभाव्य ‘प्लेइंग ११’
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी, स्पेन्सर जॉन्सन, अकील हुसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद.
सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन.




