Saturday, July 25, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी सुरुवातीचे...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी सुरुवातीचे दोन आठवडे स्पर्धेतून बाहेर

मुंबई । Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोटातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेन्नईचा आधारस्तंभ आणि कोट्यवधी चाहत्यांचे दैवत असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांना मुकणार आहे. फ्रँचायझीने शनिवारी अधिकृत निवेदनातून या वृत्ताला दुजोरा दिला असून, या बातमीने सीएसकेच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह धोनीच्या पायाच्या स्नायूंना (Calf Strain) दुखापत झाली आहे. सध्या तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून पुनर्वसनाच्या (Rehabilitation) प्रक्रियेतून जात आहे. “MS धोनी सध्या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतीमुळे तो टाटा आयपीएल २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांत मैदानात उतरू शकणार नाही. ‘थाला’ लवकर बरा व्हावा हीच आमची इच्छा आहे,” अशा शब्दांत फ्रँचायझीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना सोमवारी गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यात ‘थाला’ धोनी मैदानात दिसणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. धोनी केवळ कर्णधार म्हणून नाही, तर एक फिनिशर आणि यष्टीरक्षक म्हणूनही संघाचा कणा आहे. त्याच्या अनुपस्थितीत मैदानावरील रणनीती आखताना चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाची मोठी कसोटी लागणार आहे.

धोनीच्या अनुपस्थितीत आता यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणाकडे असेल, याबाबत क्रीडा विश्वात चर्चांना उधाण आले आहे. प्राप्त माहितीनुसार, टीम इंडियाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन आता यष्टीरक्षणाचे हातमोजे चढवणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावापूर्वी चेन्नईने एक मोठी खेळी खेळली होती. त्यांनी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड करून आपल्या ताफ्यात सामील केले होते.

संजू सॅमसनकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. आता धोनीच्या दुखापतीमुळे सॅमसनला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी चालून आली आहे. यष्टीरक्षणासोबतच मधल्या फळीत फलंदाजीची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर असेल. धोनी किमान दोन आठवडे संघाबाहेर राहणार असल्याने, या काळात चेन्नईचा संघ गुणतालिकेत आपली पकड कशी मजबूत ठेवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. चाहत्यांकडून मात्र सोशल मीडियावर धोनी लवकर बरा व्हावा (Get Well Soon MS) यासाठी प्रार्थना केली जात आहे.

ताज्या बातम्या

सरकार

“मुलांच्या संघर्षासमोर सरकार झुकले…”, आंदोलनानंतर अभिजीतच्या आईची पहिली प्रतिक्रिया

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati SambhajinagarNEET पेपरफुटी प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या...