नाशिक क्रिकेटसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहील पारख याची आय पी एल २०२६ च्या हंगामासाठी, अक्षर पटेल , के एल राहुलच्या दिल्ली कॅपिटल-डी सी – तर्फे निवड झाली आहे. आय पी एल लिलावात, ३० लाख या रकमेच्या बेस प्राइस -कमीतकमी बोली किंमत वर दिल्ली कॅपिटलने साहिल पारखला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे. बेन डकेट , डेव्हिड मिलर ,करुण नायर , कुलदीप यादव , मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी सारखे नामवंत खेळाडू डी सी मध्ये असुन केविन पिटरसन या संघाचा प्रमुख मार्गदर्शक – मेंटर – आहे. अबू धाबी येथे २४० भारतीय खेळाडुंसह , १४ सहयोगी देशातील मिळून , एकुण ३५० क्रिकेटपटूंवर आय पी एल लिलावात बोली लागली.
साहीलने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत वरिष्ठ महाराष्ट्र संघात पदार्पण केले. १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या विनू मंकड स्पर्धेत साहिल महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साहिल पारख साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना ,आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून दिला होता.
एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी झालेल्या शिबीरात साहिलची सलग तीन वर्षे निवड होत आहे. त्यानंतर आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील बीसीसीआयच्या इंटर एन सी ए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी केली होती. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदा पाठोपाठ आता आय पी एल – साठी च्या संघात निवड झाली आहे. अशा लक्षणीय कामगिरीमुळेच , नाशिकचे क्रिकेट विश्व साहीलच्या निवडीच्या अपेक्षेत होते.
नाशिकच्या अष्टपैलू रामकृष्ण घोषची मागील हंगामाप्रमाणेच यंदा देखील आगामी आय पी एल २०२६ च्या हंगामासाठी, महेंद्र सिंग धोनी,ऋतुराज गायकवाडच्या बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे याआधीच निवड झाली आहे. मागील वर्षी सी एस के संघाने आय पी एल लिलावात, रामकृष्ण घोषला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले होते त्याला आगामी हंगामा साठी चेन्नई सुपर किंग्सने संघात कायम ठेवले आहे.
साहिलच्या या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व सर्व पदाधिकारी आणि संबंधितांनी त्याचे अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




