Sunday, June 14, 2026
Homeक्रीडाIPL Match Today : आज पंजाब-दिल्ली धर्मशाळात भिडणार, एका पराभवाने गणित बिघडणार?

IPL Match Today : आज पंजाब-दिल्ली धर्मशाळात भिडणार, एका पराभवाने गणित बिघडणार?

धर्मशाला । Dharamshala

आयपीएल २०२६ चा थरार आता अंतिम टप्प्याकडे झुकू लागला असून, आज सोमवारी ११ मे रोजी धर्मशाळेच्या नयनरम्य स्टेडियमवर पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात ५५ वा रोमहर्षक सामना रंगणार आहे. एका बाजूला सलग तीन पराभवांमुळे घायाळ झालेला पंजाबचा शेर पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज करण्यासाठी सज्ज झाला आहे, तर दुसरीकडे अस्तित्वाची लढाई लढणारा दिल्लीचा संघ उलटफेर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

- Advertisement -

पंजाब किंग्सने या मोसमाची सुरुवात एखाद्या वादळासारखी केली होती. गुणतालिकेत नंबर एकवर असलेल्या पंजाबच्या टीमला आता मात्र सलग तीन पराभवांचा फटका बसला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध २२२ धावांचा डोंगर उभारूनही तो वाचवण्यात अपयश आले, तर गुजरातविरुद्ध फलंदाजी कोसळली. हैदराबादविरुद्ध २३६ धावांचा पाठलाग करताना पंजाबची झुंज अपयशी ठरली.

मात्र, पंजाबसाठी सर्वात चिंतेची बाब त्यांची खराब फिल्डिंग ही आहे. आकडेवारीनुसार, पंजाबने आतापर्यंत तब्बल १६ झेल (कॅच) सोडले आहेत. विशेषतः शशांक सिंगने एकट्याने ५ कॅच सोडले असून, या बाबतीत पंजाब फक्त चेन्नईच्या मागे आहे. आजच्या महत्त्वाच्या सामन्यात जर पंजाबला विजय मिळवायचा असेल, तर त्यांना मैदानात चपळता दाखवावीच लागेल. जर पंजाब आज जिंकला तर ते पुन्हा एकदा गुणतालिकेत शिरपेचावर विराजमान होतील.

दिल्ली कॅपिटल्सची परिस्थिती यंदा अत्यंत बिकट आहे. गेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. कर्णधार अक्षर पटेलने आतापासूनच पुढच्या मोसमाच्या तयारीचे संकेत दिले असले तरी, तांत्रिकदृष्ट्या दिल्ली अजूनही शर्यतीतून बाहेर पडलेली नाही. मात्र, आजचा पराभव आणि दुसऱ्या बाजूला आरसीबीने मुंबईला हरवले, तर दिल्लीचे पॅकअप निश्चित होईल. जुना हिशोब चुकता करण्याची दिल्लीला आज नामी संधी आहे, कारण मागच्या भेटीत पंजाबने २६५ धावांचा ऐतिहासिक पाठलाग करून दिल्लीला धुळ चारली होती. पंजाबचे बॉलिंग कोच जेम्स होप्स यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाचे संकेत दिले आहेत. अजमतउल्ला ओमरजईच्या आगमनामुळे पंजाबची ताकद वाढली आहे, तर हरप्रीत बरारला दुसरा फिरकीपटू म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

  • पंजाब किंग्स: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (WK), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टोयनिस, अजमतुल्लाह ओमरजई, शशांक सिंग, मार्को यानसन, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल. (इम्पॅक्ट प्लेयर: विजयकुमार वैशाक)
  • दिल्ली कॅपिटल्स: पथुम निसंका, केएल राहुल (WK), नीतिश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी. (इम्पॅक्ट प्लेयर: मुकेश कुमार)

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...