Wednesday, June 10, 2026
Homeक्रीडासुरुवातीला 'किंग', आता प्लेऑफसाठी 'स्ट्रगल'! आज पंजाब किंग्ससमोर 'करो की मरो'ची स्थिती;...

सुरुवातीला ‘किंग’, आता प्लेऑफसाठी ‘स्ट्रगल’! आज पंजाब किंग्ससमोर ‘करो की मरो’ची स्थिती; जाणून घ्या प्लेऑफचं समीकरण

दिल्ली । Delhi

सुरुवातीला विजयाचा चौकार-षटकार मारत विजयरथावर स्वार झालेला संघ जेव्हा अचानक पराभवाच्या गर्तेत सापडतो, तेव्हा आयपीएलचे गणित किती थरारक होते, याचा अनुभव सध्या पंजाब किंग्सचा संघ घेत आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात पहिल्या सात सामन्यांमध्ये अपराजित राहत धुमाकूळ घालणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबला (PBKKS) आता पराभवाची जणू साडेसाती लागली आहे.

- Advertisement -

सलग सहा सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेणाऱ्या या संघाची घसरगुंडी थांबलेली नाही. आज, २३ मे रोजी लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणारा सामना पंजाबसाठी केवळ सामना नसून, ती प्लेऑफमधील अस्तित्वाची ‘करा किंवा मरा’ अशी लढाई ठरणार आहे.

पंजाब किंग्सचा आजचा सामना थेट प्लेऑफच्या तिकिटाशी जोडलेला आहे. जर आज पंजाबने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला, तर त्यांचे एकूण १५ गुण होतील. मात्र, एवढ्यानेच प्लेऑफचे स्थान निश्चित होणार नाही. इतर संघांचे गणितही पंजाबची डोकेदुखी वाढवणारे आहे.

राजस्थान रॉयल्सने आपला आगामी सामना जिंकल्यास ते १६ गुणांसह पंजाबला थेट मागे टाकतील. तसेच, कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) संघही विजय मिळवून १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. अशा स्थितीत ज्या संघाचा ‘नेट रन रेट’ (NRR) सर्वोत्तम असेल, तोच प्लेऑफचे तिकीट मिळवू शकेल. समजा आजचा सामना पावसामुळे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल. अशा वेळी पंजाबचे १४ गुण होतील; परंतु दिल्ली कॅपिटल्सचा संघही १४ गुणांवर पोहोचू शकत असल्याने पुन्हा एकदा नेट रन रेटचाच आधार घ्यावा लागेल.

पंजाब किंग्ससाठी आजच्या सामन्यात पराभवाचा अर्थ थेट स्पर्धेतून बाहेर पडणे हाच आहे. लखनौने मात दिल्यास पंजाबचा संघ १३ गुणांवरच मर्यादित राहील आणि त्यांचे प्लेऑफचे स्वप्न धुळीस मिळेल. सध्या पंजाब किंग्ससाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचा सातत्याने घसरणारा फॉर्म. सलग मिळालेल्या पराभवांमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीचा खालावला आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिसलेला तो आक्रमक बाणा आता पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र आहे. जर पंजाबला स्पर्धेत जिवंत राहायचे असेल, तर कर्णधारापासून ते तळाच्या फलंदाजांपर्यंत सर्वांनाच एकाच वेळी कामगिरी उंचवावी लागेल. एकाना स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर लखनौच्या आव्हानाचा पंजाब कसा सामना करतो, याकडे आता तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गितेंचे बंड थंड होणार? दराडे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गिते (Ganesh Gite)...