Monday, April 27, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार की 'डेडलॉक' सुटणार? RCB...

IPL 2026 : चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार की ‘डेडलॉक’ सुटणार? RCB आणि गुजरात टायटन्समध्ये आज हाय-व्होल्टेज ड्रामा!

बेंगळुरू । Bengaluru

आयपीएल २०२६ चा थरार आता रंगात आला असून, आज क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आयटी सिटी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खिळल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) हे दोन तगडे संघ आज आमनेसामने उभे ठाकणार आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही संघांमधील आजवरचा इतिहास पाहता, आजचा सामना केवळ गुणतालिकेतील चढाओढ नसून आपले वर्चस्व सिद्ध करण्याची लढाई ठरणार आहे.

- Advertisement -

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले गेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सहा सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ विजय मिळवत समसमान पल्ला गाठला आहे. या ‘डेडलॉक’मुळे आज कोणता संघ विजय मिळवून ४-३ अशी आघाडी घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये गुजरातने आरसीबीच्या होम ग्राउंडवर विजय मिळवला होता, त्यामुळे आरसीबीला आज सावध राहून मैदानात उतरावे लागणार आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमची ओळखच ‘फलंदाजांचे नंदनवन’ अशी आहे. यंदाच्या २०२६ च्या हंगामातही येथे मोठी धावसंख्या पाहायला मिळाली आहे. खेळपट्टी सपाट आणि कडक असल्याने चेंडू बॅटवर सुंदर येतो, ज्यामुळे फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर तुटून पडू शकतात. सुरुवातीच्या २-३ षटकांत वेगवान गोलंदाजांना थोडी उसळी मिळू शकते, मात्र त्यानंतर फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज, सर्वांनाच धावा रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आकडेवारीनुसार, या मैदानावर झालेल्या १०४ आयपीएल सामन्यांपैकी ५६ वेळा दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार ‘चेझिंग’ला प्राधान्य देण्याची दाट शक्यता आहे.

आजच्या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल या दोन दिग्गज खेळाडूंमधील जुगलबंदी पाहण्यासारखी असेल. चिन्नास्वामीची छोटी बाउंड्री आणि सपाट खेळपट्टी या दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. आरसीबीसाठी रजत पाटीदारचे नेतृत्व आणि फिल सॉल्टची आक्रमकता महत्त्वाचे असेल, तर गुजरातसाठी जोस बटलर आणि राशीद खान ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतात.

अशी असू शकते प्लेइंग ११:

आरसीबी : विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रासिद सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड. (इम्पॅक्ट प्लेयर: देवदत्त पडिक्कल)

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, ग्लेन फिलिप्स, कागिसो रबाडा, अशोक शर्मा.

एकूणच, आजचा सामना हाय-स्कोअरिंग आणि अटीतटीचा होण्याची चिन्हे आहेत. आरसीबी आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर विजयाचा गुलाल उधळणार की गुजरात पुन्हा एकदा बेंगळुरूत बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती कांद्याची (Onion) 3196 गोण्यांची...