Wednesday, May 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : आज हैदराबाद-राजस्थानमध्ये एलिमिनेटर सामना; पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात...

IPL 2026 : आज हैदराबाद-राजस्थानमध्ये एलिमिनेटर सामना; पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार, कोण मारणार बाजी?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आज (बुधवारी) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (Sunrisers Hyderabad-Rajasthan Royals) यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. न्यू चंदिगड येथील मुल्लानपूर मैदानावर होणारा हा एलिमिनेटर सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असाच असेल. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल, तर विजेत्या संघाला फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी क्वालिफायर २ मध्ये खेळावे लागेल. तेथे त्यांची लढत क्वालिफायर १ मधील पराभूत संघाशी होईल.

- Advertisement -

सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद अनुभवी पॅट कमिन्स सांभाळत आहे, तर राजस्थान रॉयल्सची धुरा युवा रियान परागच्या (Riyan Parag) खांद्यावर आहे. दोन्ही कर्णधारांसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. यंदाच्या हंगामात हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांत हैदराबादने राजस्थानला धूळ चारली होती. त्यामुळे राजस्थानकडे त्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी आहे. हे दोन्ही संघ आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये भिडत आहेत.

यापूर्वी २०१३ मध्ये झालेल्या एलिमिनेटर सामन्यात (Eliminator Match) राजस्थान रॉयल्सने हैदराबादवर ४ गडी राखून मात केली होती. आज हैदराबादकडे त्या जुन्या पराभवाची परतफेड करण्याची संधी असेल. सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात (History) आतापर्यंत ४ एलिमिनेटर सामने खेळले असून, त्यापैकी २ सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे, तर २ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कसे आहे मुल्लानपूर मैदानाचे गणित ?

हा हाय-व्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. पंजाब किंग्जचे घरचे मैदान असलेल्या मुल्लानपूर येथील खेळपट्टीची आकडेवारी पाहता येथे नाणेफेक महत्त्वाची ठरेल. विशेष म्हणजे, बाद फेरीच्या सामन्यांचे आयोजन या मैदानावर सलग दुसऱ्यांदा होत असून, यंदाच्या हंगामातील हा या मैदानावरील चौथा सामना आहे. आजच्या अटीतटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अशी आहे आकडेवारी

एकूण सामने : १५ आयपीएल सामन्यांचे आयोजन.
पहिली फलंदाजी : ७ सामन्यांत विजय.
धावांचा पाठलाग : ८ सामन्यांत विजय (मागून फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडा फायदा).
सर्वोच्च धावसंख्या: २२८/५ (मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२५).
न्यूनतम धावसंख्या: ९५ ऑल आऊट (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, २०२५).

ताज्या बातम्या

मान्सून केरळच्या उंबरठ्यावर रेंगाळला

0
पुणे | प्रतिनिधी Pune यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेच्या सहा दिवस आधीच, म्हणजेच १६ मे रोजी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) प्रवास आता...