Monday, October 26, 2026
Homeदेश विदेशIran Israel conflict : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचेही प्रत्युत्तर; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे

Iran Israel conflict : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचेही प्रत्युत्तर; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे

दिल्ली | Delhi

इस्रायल आणि इराण यांच्यातील चालू युद्धाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. रविवारी पहाटे अमेरिकेने या संघर्षात उडी घेत इराणच्या तीन प्रमुख आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळे इराण कमजोर होईल, अशी आशा होती; परंतु इराणने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली आहेत. यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे.

- Advertisement -

अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी आज पहाटे इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांद्वारे इराणचे आण्विक तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. मात्र, इराणच्या सरकारी माध्यमांनी हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या मते, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे कोणतेही नुकसान झाले नाही आणि नागरिकांना कोणताही धोका नाही. “हल्ल्याची सुरुवात तुम्ही केली, पण शेवट आम्ही करू,” असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.

अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर ३० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, असे इस्रायलच्या सरकारी माध्यमांनी नमूद केले. या हल्ल्यांचा आवाज तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेमपर्यंत पोहोचला. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायली नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इराणच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने आपली संरक्षण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी नागरिकांना बंकर किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इस्रायली लष्करही इराणच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयार आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेल अवीव आणि जेरुसलेमसारख्या प्रमुख शहरांमध्ये नागरिक घाबरलेल्या अवस्थेत आहेत. “आम्ही सतत धोक्याच्या सावटाखाली जगत आहोत. सरकारने आमच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात चिंता वाढली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत आहे. इराण आणखी हल्ले करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती आहे.

सध्याच्या घडीला इस्रायल आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपाने युद्धाला नवे वळण मिळाले असले, तरी यामुळे शांतता प्रस्थापित होईल की संघर्ष अधिक भडकेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इस्रायलने आपली संरक्षण यंत्रणा बळकट केली असून, इराणच्या प्रत्येक कृतीला प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, जगाचे लक्ष या युद्धाच्या पुढील घडामोडींकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

मुंबई

५०० कोटींच्या कथित ऑडिओ प्रकरणाला नवे वळण; फडणवीसांचा मोठा निर्णय, मुंबई...

0
मुंबई | Mumbaiराज्यात सध्या मनोज जरांगेंनी केलेल्या ५०० कोटीच्या आरोपांवरुन मोठा वादंग सुरु झाला आहे. गेल्या आठवडाभरापसून महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटींचा दावा आणि कथित...