Saturday, June 20, 2026
Homeदेश विदेशIran Attacks Israel: इराणकडून इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला; १५० पेक्षा जास्त क्षेपणास्त्र, ड्रोनद्वारे...

Iran Attacks Israel: इराणकडून इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला; १५० पेक्षा जास्त क्षेपणास्त्र, ड्रोनद्वारे हल्ला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायल आणि इराणमधील तणाव चांगलाच वाढला आहे. इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हल्ले केले होते. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे दोन अणू शास्त्रज्ञ आणि लष्कराच्या कमांडरचा मृत्यू झाला होता. यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलने एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले. इराणच्या सैन्यांनी इस्रायलवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलच्या दिशेने १५० पेक्षा जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस नावाच्या मोहिमेद्वारे इराणने इस्राइलला प्रत्युत्तर दिले.

इराणने इस्रायलवर हवाई केल्यामुळे इस्राइलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना तातडीने तळघरांमध्ये आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, इस्राइलच्या संरक्षण यंत्रणांनी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील बहुतांश क्षेपणास्त्रे रोखण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र या हल्ल्यात काही इस्राइली नागरिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

- Advertisement -

एका वृत्तानुसार, इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणी माध्यमांनी दावा केला आहे की, इस्रायलच्या विविध शहरांवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आणि जेरुसलेम आणि तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यात १५ जण जखमी झाले आहेत.

इस्राइल डिफेन्स फोर्सच्या मिलिट्री रेडियोने दिलेल्या माहितीनुसार इराणने इस्राइलवर सुमारे १०० क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे. इराणकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इस्राइलमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर इराणने सुरू केलेले ऑपरेशन ट्रू प्रॉमिस हे मेजर जनरल मोहम्मद बाघेरी, आयआरजीसीचे प्रमुख मेजर जनरल होसेन सलामी आणि आयआरजीसी एअरोस्पेसचे कमांडर ब्रिगेडियर जनरल आमिर अली हाजिजादेह यांच्यासह इतर इराणी अधिकाऱ्यांच्या हत्येचा बदला आहे, असे इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दोन क्षेपणास्त्रे तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली. या विमानतळावर लढाऊ विमाने आणि वाहतूक विमानांचा तळ आहे. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, एका वृत्तानुसार, एक क्षेपणास्त्र तेल अवीवमध्ये पडले. ही घटना इराणी हल्ल्यामुळे झाली की इस्रायलच्या संरक्षणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, इस्रायलने इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्रांना रोखण्यात आल्याचा दावा केला आहे. देशाच्या अनेक भागात मदत आणि बचाव करणाऱ्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर इस्राइलच्या सैन्याने नागरिकांना तळघरातून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे इराणी हल्ल्याचा धोका तूर्तास कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.

या हल्ल्यांदरम्यान इराणने दावा केला आहे की, त्यांनी एका इस्रायली पायलटला जिवंत पकडले आहे. हा पायलट इराणी लक्ष्यांना लक्ष्य करणाऱ्या विमानांपैकी एकाचा सदस्य होता. इस्रायलकडून अद्याप या दाव्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे आणि युद्धासारखी परिस्थिती कायम आहे. दरम्यान, इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून इस्रायल इराणच्या हल्ल्यांना कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 255 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 1075 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...