पावसाने ओढ दिली आहे. सरकारने दुष्काळी उपाययोजनांच्या सज्जतेचे आदेश दिले आहेत. यावर्षीचा फेब्रुवारी महिना गेल्या १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना तर ऑगस्ट महिना सर्वात कोरडा महिना नोंदवला गेला. निसर्गाच्या चक्रात विपरीतता आली की सारे काही निसर्गाच्या मनावर आहे अशी सार्वत्रिक भावना व्यक्त होते. यंदाचे वर्षी त्याला अपवाद नाही. पण हे फक्त निसर्गाचाच मनावर असावे का? स्टेट ऑफ इंडियाज बर्डसचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
माध्यमात तसे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अनेक इटुकले पिटुकले पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत असे या अहवालात नमूद आहे. काही प्रजातींची संख्या तर ७०-८० टक्के घटल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. माणसे निसर्गाच्या चक्रातील घटकांची वाट्टेल तशी चेष्टा करताना आणि प्राण्यांशी क्रूरपणे वागतांना आढळतात. भोपाळमधील एक चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरत आहे. अशक्त झालेला एक बिबट्या शेतात पडून होता. स्थानिक अतिउत्साही ग्रामस्थांनी त्याचे हाल केले. त्याच्या पाठीवर बसून फोटो काढले. त्या चित्रफितीत बिबट्या अक्षरशः केविलवाणा दिसतो. हाच बिबट्या जेव्हा गोंधळामुळे माणसावर हल्ला करतो तेव्हा माणसे त्याला सहजपणे क्रूर म्हणतात. माणसे प्लॅस्टिकच्या पिशवीत शिळे अन्न भरून वाट्टेल तिथे फेकतात.
त्या पिशव्या खाल्ल्याने गायी आणि कुत्रांच्या जीवावर बेतते. जलचरांच्या श्वास कोंडतो. अनेक प्रजाती मृत्युमुखी पडतात. प्लस्टिकच्या आच्छादनामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. माणसे झाडे तोडतात. जैवविविधता टिकवण्यात आणि निसर्गचक्र अबाधित राखण्यात निसर्गाच्या साखळीतील प्रत्येक घटकाची मोठीच भूमिका असते. माणसे हे कधी जाणून घेणार? माणसे आणि बिबट्यामधील संघर्ष वाढत आहे. तथापि शेतीसाठी नुकसानकारक ठरणारे अनेक उभयचर प्राणी बिबट्याचे भक्ष आहेत. इटुकले पिटुकले पक्षी परागीभवन करतात. फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून विविध प्रकारच्या वेलींचा, झाडांचा प्रसार होतो. ते कीटकभक्षी असतात. म्हणजेच ते एकप्रकारे ते पेस्टीसाईडचेच काम करतात. त्यामुळे हानीकारक कीटकांची संख्या मर्यादित राहायला मदत होते असे पक्षीप्रेमी आणि वृक्षमित्र शेखर गायकवाड सांगतात. निसर्गमित्र, अभ्यासक, संशोधक निसर्ग साखळीतील प्रत्येक दुव्याचे वैशिष्ट्य वर्णन करतात. इटुकल्या पक्षांप्रमाणे अनेक घटकांचे अस्तित्व राखण्यात माणूस मोलाची भूमिका पार पाडू शकतात. पक्षांनी घरटी करावीत असे वातावरण त्यांच्या घरांच्या आजूबाजूला निर्माण करू शकतात. योग्य ठिकाणी योग्य वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना करू शकतात. बिबट्याने मानवी वस्तीकडे न फिरकनेही माणसांच्या हातात असू शकेल का? कुत्रे, बकऱ्या, मोकाट गुरे, डुक्कर खाण्यासाठी बिबट्या मानवी वस्तीकडे येतो. मोकळ्या जागेवर टाकलेले खरकटे, शिळे किंवा खराब झालेले अन्नपदार्थ खाण्यासाठी वर उल्लेखिलेले प्राणी मानवी वस्तीत गोळा होतत. आयती शिकार साधण्यासाठी आणि उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे येतात.
अतिक्रमणामुळे त्यांचा अधिवास कमी होतो. बिबटे तसे यायला नको असतील तर घरांच्या परिसरात स्वच्छता राखा असा सल्ला अनेक माजी ज्येष्ठ वनाधिकारी देतात. प्राण्यांचा फास बनणारे प्लास्टिक न वापरणे आणि वापरले तरी ते वाट्टेल तिथे फेकून न देणे माणसाच्याच हातात नाही का? निसर्ग साखळी आणि मानवाचे नाते समाजाने पुन्हा एकदा अभ्यासणे गरजेचे आहे. कारण निसर्गाच्या अस्तित्वावरच मानवाचे अस्तित्त्व अवलंबून आहे. ते जपणे फक्त निसर्गाच्याच नव्हे तर मानवाच्याही हातात आहे.