नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात गंगा नदी किती प्रदूषित आहे यावर भाष्य केल्यानंतर 2027 मध्ये जिथे कुंभमेळा भरणार आहे त्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या प्रदूषणावर चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असताना माध्यमांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांशी चौकशी केली.
या चौकशीअंती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी असे सांगितले की, नदीच्या सहा ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात, ते नमुने वेगवेगळ्या ठिकाणांहून जसे की रामकुंड परिसर, अप्पर गोदावरी, सोमेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून घेण्यात आले आणि रामकुंडामध्ये जेव्हा आवर्तन सोडले जाते तेव्हा वाहत्या पाण्यातून नमुने घेतले जातात. या पाण्याचा दर्जा विचारात घेता हे पाणी मध्यम किंवा चांगल्या प्रतीचे असल्याचे अधिकार्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या वाहत्या पाण्याचा दर्जा अतिउत्तम असल्याचे नमूद करण्यात आले. याचा अर्थ असा असू शकतो जेव्हा पाणी इतके चांगले आहे तर ते मिनरल वॉटरसारखे असू शकते का? याची चर्चा शहरात सुरू झाली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
कुंभमेळा लक्षात घेता शासनातर्फे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून तरतूद अपेक्षित आहे. नदीच्या पाण्याबाबत वारंवार चर्चा होत असते. गोदावरीवर काम करणार्या अनेक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचलत न्यायालयात गोदीवरीच्या प्रदूषणाबाबत व्यथा मांडली आहे. सुरुवातीच्या न्यायालयाच्या निर्णयांमध्ये त्यांनी असे सांगितले होते की, गोदावरीमधील पाणी हे वापरण्याजोगे नाही. मात्र आता प्रदुषण नियंत्रण अधिकार्यांच्या माहितीनुसार हे पाणी मध्यम ते चांगल्या प्रतीचे असल्याचे नमूद करण्यात येेत आहे.
हे सगळे पाहता गोदावरीचे पाणी स्वच्छ की अस्वच्छ याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. खरे पाहता गोदावरीचे पाणी अतिशय प्रदुषित असून वेगवेगळया ठिकाणी मलजल सोडले जात आहे आणि ठिकठिकाणी पाणवेली पाण्यात दिसतात, तसेच कचराही ठिकठिकाणी दिसतो, अशा परिस्थितीत हे पाणी मध्यम किवा चांगल्या प्रतीचे कसे असू शकते? यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहात आहे.
प्रदुषित गोदावरीचा याचा आढावा घेतला असता सोमेश्वरपासून चोपडा लॉन्स परिसरापर्यंत अनेक ठिकाणी चक्क शहरातल्या गटारींचे पाणी हे थेट गोदावरीच्या प्रवाहात मिसळत असल्याचे दिसून येते.असे असतांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निष्कर्ष म्हणजे देशभरातून स्नान, इतर विधीसाठी येणार्या हजारो भाविकांच्या भावनांशी खेळ असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
12 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाने आदेश पारित केल्याप्रमाणे गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात विभागीय आयुक्तांकडे बैठका होतात आणि त्यांच्याकडे जी समिती आहे तिथेही वारंवार या विषयांवर चर्चा होते.मनपाद्वारे नमामी गोदा प्रकल्प राबविला जात आहे. सिंहस्थ काळात गोदावरी स्वच्छतेवर चर्चा केली जात आहे. मात्र आता पावले उचलण्याची गरज भासत आहे.
गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी 10-12 वर्षांपासून भांडतो आहे. नदीत सांडपाणी, मलजल सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निष्कर्ष दिशाभूल करणारे आहेत. गोदावरीचे पाणी आरोग्यास हानिकारक व वापरास अपायकारक असल्याचे ठिकठिकाणी बोर्ड लावा असे आदेश उच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिले आहेत. दर महिन्याला पाण्याचे नमुने घेतले जातात. त्याचा अहवाल वेबसाईटवर टाकला जातो. मात्र आज 2025 वर्ष उजाडले, या सात वर्षांत फारसा बदल झालेला नाही. गोदावरी प्रदूषित असल्याचे वास्तव आहे. कागदोपत्री प्रदुषणमुक्ती नको तर ती कृतीतून दाखवावी लागेल.
निशिकांत पगारे, गोदावरी प्रदूषणमुक्ती कार्यकर्ते
गोदावरीत नाल्यातील मलजल, गटारीचे पाणी मिसळत आहे हे निर्विवाद सत्य आहे. हेच पाणी पुढे भाविक तीर्थ म्हणून घरी नेत असतील तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांचा निष्कर्ष म्हणजे भाविकांच्या भावनांशी खेळ आहे.
देवांग जानी, गोदावरी कार्यकर्ते
