Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगसंकटकाळात ‘युनिसेफ’ हाच दिलासा?

संकटकाळात ‘युनिसेफ’ हाच दिलासा?

विकसनशील देशांतील बालके आणि स्त्रियांचे आरोग्य तसेच इतर कल्याणकारी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून ‘युनिसेफ’ची जगात ओळख आहे. हे नाव ऐकताच अनेकांना दिलासा मिळतो.

‘करोना’ संसर्ग रोखण्यासाठी एकाच वेळी सर्वत्र औषधपुरवठा आणि वाटप करणे अगत्याचे आहे. 170 देशांत हे काम करण्याचे आव्हान ‘युनिसेफ’ने स्वीकारले आहे. अशी विश्वव्यापी आणि वेगवान मोहीम कदाचित पहिल्यांदाच राबवली जाईल. ‘युनिसेफ’चा पुढाकार जगासाठी, विशेषत: सर्वाधिक ‘करोना’ प्रभावित विकसनशील राष्ट्रांची काळजी कमी करणारा ठरावा.

- Advertisement -

चीनच्या वुहान शहरातून प्रकटलेला ‘करोना’ विषाणुचा आधुनिक ब्रम्हराक्षस जगभर हैदोस घालत आहे.

पावणे तीन कोटींहून जास्त लोकांना त्याने ग्रासले आहे. त्यावर जगात कुठेही आजतरी नेमका इलाज अद्याप नाही. तरीही रुग्णांना बरे करण्यासाठी रुग्णालयांतील देवदूत अहोरात्र प्रयत्नशील आहेत. सुरक्षित अंतर, तोंडावर मुसके, स्वच्छोदकाचा (सॅनिटायझर) वापर, प्रतिकारशक्ती वाढवणे हाच ‘करोना’पासून सुरक्षित राहण्याचा इलाज ठरत आहे.

जगातील 215 देश केवळ आरोग्यानेच नव्हे आर्थिकदृष्ट्यासुद्धा कमालीचे बाधित झाले आहेत. ‘करोना’चा उद्रेक वाढत गेल्यावर सर्वच देश सतर्क झाले. प्रतिबंधक लस किंवा औषध शोधण्यासाठी एकशे पन्नासपेक्षा जास्त औषध संशोधनकार्य सुरू आहे. काही औषधांच्या दुसर्‍या तर काहीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. भारतातही दोन-तीन ठिकाणी अशा चाचण्या सुरू असल्याचे सांगितले जाते. संशोधनकार्य होऊन परिपूर्ण सुरक्षित इलाज केव्हा बाजारात येतो याकडे जगाचे डोळे लागले आहेत.

मोठमोठ्या अर्थव्यवस्था ‘करोना’ने गाळात घातल्या आहेत. या महासंकटाबद्दल जागतिक आरोग्य संघटनासुद्धा संभ्रमित आहे. महासाथ कधी आटोक्यात येईल याबाबत ही संघटना आत्मविश्वासाने अद्यापतरी सांगू शकलेली नाही. मात्र ‘करोना’ साथ लवकर संपुष्टात येण्याची शक्यता तूर्तास नाही; म्हणून ‘करोना’सोबत जगायला शिका, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने असहाय्यपणे आधीच दिला आहे.

औषध किंवा इलाज उपलब्ध झाला तरी त्यामुळे ‘करोना’पासून मानवाचे किती संरक्षण होऊ शकेल याबद्दलसुद्धा आरोग्य संघटना पुरेशा खात्रीने कसे सांगू शकणार? तरीसुद्धा एकदा इलाज उपलब्ध झाल्यावर ‘करोना’शी लढायला हाताशी एक सुरक्षाकवच येईल याबद्दल जगाला मात्र आशा वाटत आहे.

जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्याची स्वप्ने भारतीय जनतेला गेली पाच-सहा वर्षे दाखवली जात आहेत. टाळेबंदीमुळे ती स्वप्ने हवेतच विरणार अशी लक्षणे आहेत. आर्थिक बाबतीत नव्हे, पण ‘करोना’ रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात सर्वोच्च स्थान मिळवण्याच्या दिशेने मात्र भारताची भरधाव घोडदौड सुरू आहे.

देशातील एकूण रुग्णसंख्या अर्ध्या कोटीकडे आगेकूच करीत आहे. 35 लाखांहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 76 हजारांपेक्षा अधिक रुग्ण दगावलेही आहेत. रुग्ण बरे होण्याचा भारताचा दर 77 टक्क्यांवर पोहोचला ही आशादायक बाब आहे. तथापि दिवसाकाठी सुमारे एक लाखापर्यंत नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे.

रुग्णालयांतील खाटांची त्या मानाने मर्यादित संख्या आणि उपचार सुविधा पुरवताना आरोग्य यंत्रणांची दमछाक होत आहे. रुग्णवाढ अशाच वेगाने सुरू राहिल्यास नोव्हेंबर-डिसेंबरअखेर भारतातील संसर्गबाधितांची संख्या सुमारे दीड कोटींपर्यंत पोहोचेल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात आधी 16-17 व्या क्रमांकावर असलेला भारत अवघ्या दोन-तीन महिन्यांत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. जिगरी दोस्त असलेल्या अमेरिकेशी रुग्णसंख्येच्या बाबतीत स्पर्धा करीत आहे. तूर्तास अमेरिका सध्या सर्वोच्च स्थान टिकवून आहे. रुग्णसंख्येत पडणारी दररोजची घाऊक भर पाहता लवकरच अमेरिकेलाही भारतापुढे हार मानावी लागेल यात हे निश्चित!

‘करोना’वरचा रामबाण इलाज लवकरच येणार, अशा बातम्या दोन महिन्यांपासून माध्यमांत झळकत आहेत. मात्र नव्या औषधांचे वितरण जगभर जलदगतीने आणि न्याय्यपद्धतीने कसे होईल या व्यवस्थेचाही त्यावेळी योग्य विचार होईल. त्याशिवाय ‘करोना’चा प्रादुर्भाव रोखून तो काबूत आणणे कठीण आहे. ‘युनिसेफ’ने (युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड) या आंतरराष्ट्रीय संस्थेने ही गरज वेळीच ओळखून या कामी पुढाकार घेतला आहे.

संसर्ग रोखण्यासाठी एकाच वेळी जगभर औषधपुरवठा आणि वाटप करणे अगत्याचे आहे. 170 देशांत हे काम करण्याचे आव्हान ‘युनिसेफ’ने स्वीकारले आहे. अशी विश्वव्यापी आणि वेगवान मोहीम कदाचित पहिल्यांदाच राबवली जाईल. जगातील 28 औषधी उत्पादक कंपन्यांनी आपापल्या उत्पादनांच्या नियोजनाची माहिती ‘युनिसेफ’ला दिली आहे.

श्रीमंत देश स्वबळावर मुबलक प्रमाणात औषध उत्पादन आणि पुरवठा आपापल्या जनतेला करतील. खरी अडचण होईल ती गरीब देशांची! ती लक्षात घेऊन 92 गरीब देशांसोबतच 80 सधन देशांसाठीसुद्धा औषधांची खरेदी करण्यासाठी ‘युनिसेफ’ समन्वयकाची भूमिका बजावणार असे सांगितले जात आहे. तसे झाल्यास गरीब देशांसाठी ही दिलासादायक बाब ठरेल.

‘युनिसेफ’ने उचललेले हे शिवधनुष्य पेलण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक तसेच अन्य काही संस्थांनीही पाठबळ दिले आहे. ‘पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायझेशन’नेदेखील मदतीचा हात दिला आहे. जनहिताच्या या मोहिमेतून वर्ष-दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात औषध उपलब्धता होऊ शकेल, असा आशावादही व्यक्त केला जात आहे.

‘युनिसेफ’ ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक महत्त्वपूर्ण शाखा-संस्था! विकसनशील देशांतील बालके आणि स्त्रियांचे आरोग्य तसेच इतर कल्याणकारी कार्यांसाठी ही संस्था कार्यरत आहे.

बालकांसाठी आवश्यक लसी आणि प्रतिजैविक औषधांचा पुरवठा या संस्थेकडून केला जातो. कुपोषित माता तसेच बालकांना मदत, आपत्तीकाळात तात्पुरत्या निवारा छावण्यांची उभारणी, शैक्षणिक साहित्यपुरवठा आदी उपक्रम ही संस्था राबवते. बालके व महिलांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या कार्यामुळे ‘युनिसेफ’चे नाव सर्वत्र परिचित आहे. हे नाव ऐकताच अनेकांना दिलासा मिळतो.

‘करोना’ संकटकाळातही ही संस्था मदतीसाठी सरसावली आहे. जगातील 192 देशांत तिचे कार्य चालते. दीडशेहून अधिक देशांत तिची कार्यालये आहेत. त्यामुळे ‘करोना’वरील औषधोपचार वितरण आणि पुरवठ्याचे ‘युनिसेफ’ने हाती घेतलेले महत्त्वपूर्ण कार्य नियोजनबद्ध होईल याबद्दल आशा बाळगायला हरकत नसावी.

‘युनिसेफ’चा पुढाकार जगासाठी, विशेषत: ‘करोना’ने सर्वाधिक प्रभावित विकसनशील राष्ट्रांची काळजी कमी करणारा ठरावा. ‘करोना’ने भारतात समूह संसर्गाचा टप्पा गाठला आहे, पण त्याबाबत सरकार पातळीवर आता फारसे कोणी बोलत नाही.

भारतात मे महिन्यातच 64 लाख लोकांना ‘करोना’संसर्ग झाला होता, अशी धक्कादायक माहिती ‘आयसीएमआर’च्या ‘राष्ट्रीय सिरो सर्व्हेक्षणा’तून उघड झाली आहे. टाळ्या-थाळ्या किंवा दिवे लावण्यासारख्या उपक्रमांतून समूह करमणुकीशिवाय काहीही साध्य होऊ शकलेले नाही.

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आणि संसर्ग नियंत्रणात आणूनच ‘करोना’चा नि:पात करणे शक्य होईल. मात्र त्यासाठी लोकजागृती, आरोग्य यंत्रणांची तत्परता, चाचण्या वाढवून उपचारांतून रुग्ण बरे होण्याचा दर वाढवणे आणि प्रभावी औषधे उपलब्ध झाल्यावर व्यापक स्वरुपात लसीकरण अशा चतु:सूत्रीचा अवलंब करावा लागेल. त्याशिवाय ‘करोना’ची विश्वव्यापी लाट ओसणार नाही.

‘करोना’चा विळखा सैल झाल्याशिवाय, किंबहुना त्याचे उच्चाटन झाल्याशिवाय कोसळलेल्या अर्थव्यवस्थांना पुन्हा ‘हिरवी पालवी’ फुटणे आणि त्या सावरणे कठीण आहे. त्या दृष्टीने ‘युनिसेफ’ने आपली ‘वसुधैवकुटुंबकम’ ही भूमिका रास्तपणे राबवल्यास जगात सर्वत्र तिचे स्वागतच होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या