दिल्ली । Delhi
मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून, इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्यावर इस्रायली लष्कराने (IDF) जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अयातुल्लाह अली खामेनी यांच्या निधनानंतर मोजतबा यांची आज सकाळीच इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून औपचारिक घोषणा करण्यात आली होती. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.
मोजतबा खामेनी यांची नियुक्ती आज सकाळी ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) चे वरिष्ठ कमांडर आणि धार्मिक विद्वानांच्या उपस्थितीत करण्यात आली. मात्र, संरक्षणाच्या कारणास्तव मोजतबा स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते. त्यांच्या नियुक्तीची बातमी ताजी असतानाच, दुपारपर्यंत त्यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त धडकल्याने संपूर्ण इराणमध्ये खळबळ माजली आहे. या हल्ल्यामुळे आयआरजीसी आणि धार्मिक नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इराणच्या सत्ताकेंद्राला मोठा धक्का बसला आहे.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डिफ्रिन यांनी या कारवाईची पुष्टी करताना सांगितले की, इस्रायली सैन्याने इराणमधील ‘कोम’ या शहराला लक्ष्य केले. विशेषतः, इराणच्या पुढील सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या ८८ सदस्यीय ‘तज्ज्ञ सभा’ (Assembly of Experts) ज्या इमारतीत कार्यरत होती, त्या इमारतीवर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विधानसभेच्या अनेक सदस्यांसह अनेक अधिकारी ठार झाले आहेत. मोजतबा खामेनी जिवंत असले तरी ते गंभीर जखमी आहेत आणि ते जोपर्यंत पदत्याग करत नाहीत, तोपर्यंत ते इस्रायलच्या रडारवर राहतील, असा इशारा आयडीएफने दिला आहे.
यापूर्वी, मोजतबा यांचे वडील आणि इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात मृत्यू झाला होता. अमेरिकेने डागलेल्या ‘टोमाहॉक’ क्षेपणास्त्राने त्यांच्या कार्यालयाला अचूक लक्ष्य केले होते. वडिलांच्या निधनानंतरच मोजतबा यांच्याकडे ही सूत्रे सोपवण्यात आली होती. मात्र, इस्रायल आणि अमेरिकेने आता आपले लक्ष केवळ व्यक्तींपुरते मर्यादित न ठेवता इराणच्या अणू सुविधा आणि तेल साठे नष्ट करण्याकडे वळवले आहे.
इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावर झालेल्या या थेट हल्ल्यामुळे संपूर्ण आशिया खंडात युद्धाचे ढग गडद झाले आहेत. मोजतबा खामेनी यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबत इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, इस्रायलने स्पष्ट केले आहे की, इराणची सत्ताव्यवस्था खिळखिळी करणे आणि त्यांच्या अणू कार्यक्रमाला खीळ घालणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. या हल्ल्यानंतर आता इराणकडून कोणत्या प्रकारचा प्रतिहल्ला होतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.




