Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशMiddle East Crisis : मोठी बातमी! इस्रायलचा इराणच्या राजधानीवर थेट हल्ला, आकाशात...

Middle East Crisis : मोठी बातमी! इस्रायलचा इराणच्या राजधानीवर थेट हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले

दिल्ली । Delhi

मध्यपूर्वेतील तणाव आता एका भयानक वळणावर येऊन पोहोचला असून इस्रायलने इराणवर मोठा लष्करी हल्ला चढवला आहे. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी अधिकृतपणे या कारवाईची पुष्टी केली असून, ‘शील्ड ऑफ जूडा’ असे या विशेष मोहिमेचे नाव देण्यात आले आहे. हा हल्ला इतका भीषण आहे की, संपूर्ण इराणमध्ये सध्या घबराटीचे वातावरण असून आकाशात फक्त धुराचे लोट आणि रुग्णवाहिकांचे सायरन ऐकू येत आहेत. इराणचे एअरस्पेस (हवाई क्षेत्र) पूर्णपणे रिकामे करण्यात आले असून विमान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

- Advertisement -

इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला प्रतिबंधात्मक स्वरूपाचा होता. “जर आम्ही आज हल्ला केला नसता, तर इराणने आमच्यावर मोठा हल्ला केला असता,” असे स्पष्टीकरण इस्रायल सरकारने दिले आहे. या संयुक्त कारवाईत इस्रायलला अमेरिकेचीही साथ लाभली असल्याचे समोर आले आहे. इराणमधील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अणुकेंद्रांवर इस्रायलने बॉम्बवर्षाव केला आहे. इतकेच नव्हे तर इराणचे राष्ट्रपती भवन आणि गुप्तचर मंत्रालयाच्या इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले आहे. स्फोटांचे आवाज ऐकताच इराणमधील नागरिकांनी बंकरचा आश्रय घेतला असून, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

या हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता इस्रायलमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराणकडून कोणत्याही क्षणी प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता असल्याने इस्रायलमध्ये विशेष आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आयडीएफने (IDF) नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. होमफ्रंट कमांडच्या सूचनेनुसार, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शैक्षणिक संस्था, सार्वजनिक कार्यक्रम आणि कामाच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. इस्रायलमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करता येईल.

एकीकडे लष्करी कारवाई सुरू असताना दुसरीकडे इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ने मानसिक युद्धाची (Psychological Warfare) रणनीती अवलंबली आहे. मोसादने आपल्या अधिकृत फारसी टेलिग्राम चॅनेलवरून इराणी नागरिकांना एक भावनिक आवाहन केले आहे. “इराणी बांधवांनो आणि भगिनींनो, तुम्ही एकटे नाही आहात. इराणला पुन्हा त्याच्या सुवर्णकाळाकडे नेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो,” असे मोसादने म्हटले आहे. यासाठी त्यांनी एक विशेष सुरक्षित टेलिग्राम चॅनेलही लाँच केले असून, इराणी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या इराणमधील अनेक शहरांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट आहे. केवळ रुग्णवाहिकांचे आवाज आणि ढिगाऱ्यांखाली दबलेल्या लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत असल्याचे चित्र आहे. इराणमधील प्रमुख विमानतळ, ज्यामध्ये इरबिल विमानतळाचा समावेश आहे, ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री डी.एम. कॅट्झ यांनी स्पष्ट केले की, या हल्ल्याचा एकमेव उद्देश ‘इस्रायलसमोरील धोका कायमचा दूर करणे’ हाच आहे. जागतिक स्तरावर या युद्धाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून संपूर्ण जगाचे लक्ष आता इराणच्या पुढील पाऊलाकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजुरच्या तरूणाची ‘एटीएस’कडून चौकशी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या संशयावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील एका तरूणाची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)...