Friday, May 29, 2026
Homeदेश विदेशMiddle East Conflict : इस्रायल-अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, तेहरानमधील तेल साठे केले...

Middle East Conflict : इस्रायल-अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, तेहरानमधील तेल साठे केले लक्ष

दिल्ली । Delhi

- Advertisement -

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाने आता अत्यंत रौद्र रूप धारण केले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर क्षेपणास्त्रांचा मोठा वर्षाव केला असून, यामध्ये पहिल्यांदाच इराणची राजधानी तेहरानमधील महत्त्वाच्या तेल डेपो आणि रिफायनिंग सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण तेहरान शहरात आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, या तेल डेपोतून चीनसह अनेक देशांना इंधनाचा पुरवठा केला जातो, त्यामुळे या कारवाईचे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इस्रायली संरक्षण दलाने (IDF) शनिवारी अधिकृत निवेदन जारी करून या हल्ल्याची पुष्टी केली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे तेहरानमधील इंधन साठ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे आयडीएफने म्हटले आहे. शाहरान तेल डेपोमध्ये लागलेल्या भीषण आगीची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असून, इराणच्या तेल पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. इराणची ‘दहशतवादी राजवट’ या इंधन साठ्यांचा वापर त्यांच्या लष्करी यंत्रणा आणि संस्थांना बळ देण्यासाठी करत असल्याचा गंभीर आरोप इस्रायलने केला आहे. हा हल्ला इराणची लष्करी शक्ती कमकुवत करण्यासाठी उचललेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे इस्रायलकडून सांगण्यात येत आहे.

या लष्करी कारवाईत अमेरिकेचा थेट सहभाग असल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षात बलिदान देणाऱ्या अमेरिकन सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचवेळी त्यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणने आपल्या प्रक्षोभक कारवाया त्वरित न थांबवल्यास भविष्यात या हल्ल्यांची तीव्रता आणि व्याप्ती अधिक वाढवली जाईल, अशी उघड धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे हा संघर्ष अधिक लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.

दुसरीकडे, इराणने या हल्ल्यांनंतर आक्रमक पवित्रा घेतला असून अमेरिकेला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. इराणचे वरिष्ठ अधिकारी अली लारीजानी यांनी अमेरिकेवर जोरदार टीका करताना म्हटले आहे की, वॉशिंग्टन आपले राजकीय आणि लष्करी उद्दिष्ट पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. या युद्धाची मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा दावा लारीजानी यांनी केला आहे. इराणकडून कोणत्याही क्षणी प्रत्युत्तराचा मोठा हल्ला होऊ शकतो, या शक्यतेने संपूर्ण पश्चिम आशियात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या ताज्या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. इराणच्या तेल क्षेत्रावर झालेल्या या हल्ल्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आता पश्चिम आशियातील हे नवे युद्ध जागतिक शांततेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

ताज्या बातम्या

Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचे रॅकेट उघड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील अहिल्यानगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये अँक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (27 मे) रात्री धाड टाकून सुरू...