Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedनामांतराचा मुद्दा आम्ही एकत्र बसलो की निकाली निघेल! खा. संजय राऊत

नामांतराचा मुद्दा आम्ही एकत्र बसलो की निकाली निघेल! खा. संजय राऊत

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी केले होते. आता केवळ कागदावर बदलायचे आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदाचा विषय नसून आम्ही एकत्र बसले की नामांतराचा हा मुद्दा निकाली निघेल, असा विश्वास सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदर संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आलेली असताना नामांतराचा विषयही जोर धरू लागला असताना केवळ निवडणुकीपूरता शिवसेनेला नामांतराचा विषय आठवतो, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

याविषयी प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांना विचारले असता ते बोलत होते. दरम्यान, “औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत.

काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले व जनतेने ते स्वीकारले आहे.

त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

अरे बापरे…मला भीती वाटतेय..

सामनामध्ये आपल्याविरोधात केले जाणारे लिखाण हे आक्षेपार्ह असून त्यातील भाषा गलिच्छ आहे, अशी तक्रार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. इतकेच नव्हे तर आपण यासंदर्भात थेट संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचेही ते म्हणाले होते. यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, अरे बापरे… मला आता त्यांची भीती वाटत आहे. ते पत्र लिहित आहेत.

सामना वाचायला लागले, चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सकारात्मक दृष्टिकोनातून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार राहणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या