मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर नोटा वाटल्याचा आरोप होत आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते क्षीतीज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसोबत विरारच्या हॉटेलमध्ये जाऊन धडक दिली, तसंच विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप केला.तर विनोद तावडे यांनी संबंधित आरोप फेटाळले. विशेष म्हणजे या राड्यादरम्यान क्षितीज ठाकूर यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर नोटांचे बंडल दाखवले. या घटनेवर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनोद तावडे पैसे वाटतानाचा व्हिडीओ असेल तर तो कोणी बघायला हवा, काल अनिल देशमुखांचे डोके आपोआप फुटले. तो हल्ला कोणी केला, परग्रहावरून दगड आला का, असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केला. त्यानंतर आज पैसे वाटपाचा व्हिडीओ समोर आला असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून? कुणाच्या खिशातून जात होते? याची माहिती समोर आली पाहिजे, विनोद तावडेंकडे पैसे सापडले असतील तर हे कदाचित गँगवॉ़रही असू शकते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हे ही वाचा: Vinod Tawade: विनोद तावडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; निवडणूक आयोगाकडून एफआयआर दाखल
“आता मी तुळजाभवानीला गेलो तेव्हा माझी बॅग तपासली. ह्यांच्या बॅगेतील पैसे तपासणार कोण? निवडणूक आयोगाने ह्यांच्या बॅगेची तपासणी केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
तर हा गँगवॉरही असू शकतो
मला माहिती मिळाली की कदाचित गँगवॉर असू शकेल. निवडणूक आयोगाने हे घडले असेल तर कारवाई केलीच पाहिजे. कायदा सर्वांना सारखा आहे. तावडे जर का तावडीत सापडले असतील तर आजवर सरकारे पाडली कशी त्याचा हा पुरावा आहे. ज्यांनी उघडकीस आणले त्यांचे कौतुक केले पाहिजे. कदाचित हे त्यांच्यातील गँगवॉर असू शकते. भाजपमध्ये असेल किंवा शिंदेमधील असेल. कारण नाशिकमध्ये काल असेच व्हिडीओ समोर आले आहेत, असे ठाकरे म्हणाले.
‘बहिणीला १५०० रुपये आणि यांना थप्प्याच्या थप्प्या चालल्या आहेत. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्याने बघत आहे. भाजप, मिंधे आणि अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? पैसा बाटेंगे और जितेंगे, असे त्यांचे काही आहे का? याचा छडा लागला पाहिजे’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा