विवेक वेलणकर,
ज्येष्ठ अभ्यासक
समृद्धी महामार्गाचा मोठा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होणे ही खरे पाहता आनंदाची बाब होती, कारण या मार्गामुळे पायाभूत सुविधांना नवी बळकटी मिळाली, प्रवाशांचा प्रवासाचा बराचसा वेळ वाचला आणि नाशवंत माल कमी वेळेत मुख्य बाजारपेठेपर्यंत आणणे शक्य झाल्याने व्यापार उदिमात मोठी वाढ झाली. अर्थातच या मार्गाचे काम 100 टक्के पूर्ण होऊन पूर्ण लांबीचा मार्ग खुला झाल्यानंतर हे सगळे लाभ अधिक प्रमाणात मिळणार आहेत.
मात्र एकीकडे हे सगळे आशादायी चित्र असताना या महामार्गाचा वापर सुरू झाल्यापासून त्यावरील भीषण अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यावरील वाढती चर्चाही लक्षवेधी ठरत आहे. असे अपघात तत्कालीन परिस्थितीवर परिणाम करतातच खेरीज ते अनेक विचार आणि आशंकांनाही चालना देतात. म्हणूनच वेळीच गांभीर्य ओळखून आवश्यक ते उपाय करणे गरजेचे आहे. अशा अपघातांमागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे रस्ता मोकळा असल्यामुळे वाहने अतिशय वेगाने चालवली जातात. वेगाचीदेखील एक नशा असते. समृद्धी महामार्ग नवीन असून त्यावर जास्त रहदारीही नाही. त्यामुळेच छान मोकळा रस्ता दिसत असताना चालकांची वेगात जाण्याची वृत्ती वाढते आणि अचानक एखादा अडथळा समोर आला तर वाहन नियंत्रणाबाहेर जाणे, ताबा सुटणे हे प्रकार घडतात. म्हणूनच असे अपघात टाळायचे असतील तर रस्ता मोकळा असला तरी वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवणे आणि सावधपणे पुढे जाणे यास पर्याय नाही.
अपघात घडतात म्हणून रस्त्याला, बांधणीला दोष देऊन काहीही उपयोग नाही. दुसरा एक मुद्दा म्हणजे चालकाची पुरेशी झोप झालेली नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसते. असे महामार्ग कित्येक किलोमीटरपर्यंत सरळसोट असतात. कोणतीही वळणे नसतात. अशावेळी एकाच गतीने आणि दिशेने गाडी चालवताना आपोआपच मेंदूला पेंग येऊ लागते आणि तीच अपघाताचे कारण ठरते. म्हणून ही बाब टाळणे गरजेचे आहे. आणखी एक बाब म्हणजे अशा मोठ्या रस्त्यांवर येण्यापूर्वी वाहनाची पूर्ण तपासणी व्हायला हवी. अनेकदा टायर फुटल्यामुळे अपघाताचे प्रसंग ओढवताना दिसतात. महामार्गाच्या सुरुवातीला टायरची तपासणी करण्याची यंत्रणा असली तरी ती किती वाहनांची तपासणी करणार?, कोणते निकष लावून वाहनांना प्रवेश नाकारणार हा प्रश्नच आहे. खेरीज किती वाहनचालक ही बाब स्वीकारतात हादेखील अभ्यासाचा विषय आहे. दुसरे म्हणजे महामार्गांना एक नव्हे तर अनेक प्रवेश केंद्रे असतात. त्यामुळेच वाहनांची तपासणी करायची तर अशा प्रत्येक केंद्रावर यंत्रणा उभी करावी लागेल. खेरीज प्रवेश केंद्रांवर वाहनाची उत्तम स्थिती असली तरी प्रवासादरम्यान त्यात काही दोष उत्पन्न होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच या सगळ्या पूरक गोष्टी असल्या तरी वाहनचालकाने पूर्ण काळजी घेऊन वाहन चालवण्याला पर्याय नाही.
महामार्गांवर माल घेऊन जाणार्या अवजड वाहनांप्रमाणेच प्रवासी वाहनांचीही मोठी गर्दी असते. ती असायलाच हवी, कारण चलनवलन, प्रवास वाढून अर्थव्यवस्था बळकट करणे हाच तर रस्ते बांधण्यामागील मुख्य उद्देश असतो. त्यामुळे असे अपघात रोखायचे तर स्वत:च स्वत:ची काळजी घेणे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबत नसल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी या अपघातामागील कारण शोधण्यासाठी तीन महिने संशोधन केले होते. या संशोधन अभ्यासात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले. अशा अपघातांमागे ‘महामार्ग संमोहन’ जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एखादा महामार्ग सरळ रेषेत असतो, कोणत्याच अडथळ्यांशिवाय महामार्गावर तुमची गाडी एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते तेव्हा चालकाच्या शरीराची हालचाल स्थिर होते. या अवस्थेत मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना अनेक चालक ‘महामार्ग संमोहनाचे’ बळी ठरले असून अपघाताच्या काही सेकंद आधी त्यांच्या मेंदूने वा शरीराने हालचाल किंवा क्रिया करायला हवी ती वेळेत न केल्याने अपघात झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘महामार्ग संमोहन’ 33 टक्के अपघातांना कारणीभूत ठरल्याचे एका अहवालात म्हटले आहे. याखेरीज निष्काळजी पद्धतीने केलेले ‘लेन कटिंग’ हेदेखील समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचे आणखी एक कारण आहे. आजवर झालेल्या अपघातात 40 टक्के अपघात साईड डॅशमुळे झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.