धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना वैद्यकीय सेवा त्वरीत उपलब्ध व्हावी म्हणून शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर औषधोपचार करणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असून रुग्ण संख्याही वाढत आहे म्हणून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी अतिरिक्त रुग्णालयांची आवश्यकता भासत आहे. परंतू खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेत नसून त्यांच्याकडे दाखल रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यास त्या रुग्णास इतर दवाखान्यात पाठविण्यात येते किंवा जाण्याबाबत सल्ला दिला जात आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. असे निदर्शनास आले आहे. म्हणून शहरातील सर्व रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करावेत असे निर्देश आयुक्त शेख यांनी दिले आहेत.
कोणतीही खासगी, ट्रस्ट संचलित रुग्णालय कोरोना रुग्णास दाखल करुन त्यांच्यावर उपचार करतील तसेच मनपा वैद्यकीय अधिकारी किंवा टास्क फोर्स समितीच्या संमतीशिवाय औषधोपचारासाठी इतरत्र पाठविता येणार नाही. या प्रमाणे कारवाई न केल्यास संबंधीत रुग्णालयांविरुध्द मुंबई नर्सिंग होम अॅक्ट 1949 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
तसेच हॉस्पीटल आस्थापनेवरील वैद्यकीय किंवा पॅरामेडिकल कर्मचारी, वार्डबॉय व इतर कर्मचारी यांनाही सेवा देणे बंधनकारक आहे. तसेच त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन द्यावी. त्यांनी सेवा देण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. असेही आयुक्त शेख यांनी सांगितले.
खासगी हॉस्पीटलमधील सर्व डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी व इतर कर्मचार्यांचे नाव, पत्ता व फोन नंबर तात्काळ महापालिकेकडे सादर करण्याबाबत देखील आदेश आयुक्त शेख यांनी दिले आहेत.