लतादीदींच्या आवाजाने सकाळ मंगल होई, त्यांच्या भक्तिमय आवाजाने त्यास एक सुगंध चढे, त्यांच्या शास्त्रशुद्ध गाण्याची जादू दिवसभर मनात राही, त्यांची विरहिणी, आर्तता, मन कातर कातर करून जाई, त्यांची सहजसुंदर प्रेमगीते हृदयाचे पाणी पाणी करत….
तो स्वर कायमचा बंद झाला..जवळ जवळ सत्तर वर्षांची कारकीर्द, पंतप्रधान पंडित नेहरूंसमोर गायलेले अजरामर ‘ऐ मेरे वतन के लोगों’, अनेक राष्ट्रीय/ अंतरराष्ट्रीय पुरस्कार/ सन्मान, भारताला विदेशी मंचावर मिळालेला मोठा गौरव..अनेक भाषांत, अनेक संगीतकारांसोबत, चित्रपट, गैरचित्रपट, खासगी अल्बम.. छाती फुटून जाईल एवढी मोठी दीदींची कारकीर्द. त्यांच्या बरोबर अनेक गायक, गीतकार, संगीतकारांच्या पिढ्या वाढल्या व फोफावल्या. अनेक संगीतदर्दी त्यांच्या गाण्यांबरोबर वाढले. आमची पिढी किती भाग्यवान की लतादीदींच्या अगदी कोवळ्या आवाजापासून ते पोक्त आवाजापर्यंत सर्व प्रकारच्या गायनात, सप्तसुरात आम्ही तुडुंब न्हायलो.
दीदींच्या जाण्याने एका मोठ्या संगीताच्या युगाची आज अखेर झाली. ते आवाज, संगीत, ती गीते व तत्कालीन स्त्री- पुरुष सहगायक (दीदींची भावंडे आशाताई, उषाताई व पं. हृदयनाथजी…) सारे सारे अजब रसायन. तो कालखंड, तसे चित्रपट व दीदींचा स्वरसाज उत्तम वठवणार्या सिनेतारका आता परत होणे नाही.
माझी आई स्व. गीता सामंत व पूर्वाश्रमीची सुधा मोंडकर नाशिकजवळील सिन्नरची. तिच्या गोड गळ्याकरता प्रसिद्ध होती सिन्नरमध्ये. पुढे मुंबईला ती शिक्षणासाठी आली तेव्हा जोगेश्वरीचे ईस्माईल युसूफ कॉलेज तिच्या सुमधूर गळ्याने तिने गाजवले. तिने गायलेली सर्व गाणी तत्कालीन लतादीदींनी गायलेली साधारण पन्नासच्या दशकातील. पुढे काही ओळखीतून सुप्रसिद्ध संगीतकार कै. वसंत प्रभू यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या ‘शिकलेली बायको व बायकोचा भाऊ’ या चित्रपटात लतादीदी गात असलेल्या गाण्यात कोरसमध्ये तिला पार्श्वगायनाची संधी मिळाली. तेव्हा दीदी, आशाताई व उषाताई यांच्याशी बोलण्याची तिला संधी मिळाली व मेहबूब स्टुडिओपासून दीदींच्या त्यावेळच्या मोठ्या गाडीतून लिफ्टही. सांसारीक जबाबदार्यांमुळे आई फार पुढे गाऊ शकली नाही. आज ती हयात नाही, पण तिची दीदींच्या संदर्भातली ही आठवण निश्चित सांगावीशी वाटली. लतादीदी तुमच्याआमच्यातून जाणे शक्यच नाही. त्या त्यांच्या सुरासमवेत आज, आत्ता आपल्या समवेत आहेत.
स्वरांजली
दूर निनादे आर्त एक स्वर
स्तब्ध जाहला सारा परिसर
पंचतत्त्वात विरूनी गेला
स्वरलतेचा दिव्य सप्तसूर
कोटी कोटी स्पंदने उमटली
संथ उदासी भरून आली
उरे पापणीवर ओलावा
अन नकळतसे ओघळ गाली
जादू सुरांची टिकून आहे
लता चिरायू हृदयी निरंतर
अनेक तार्यांमध्ये झळाळे
एक चमकता तारा अन स्वर
अर्धशतक गाजले सुरांनी
किती वाहवा किती करताडन
स्तुतीसुमनांना शब्दची थिटे
ऐसे सुमधुर लता गायन
प्रकाशातून प्रकाशाकडे
प्रवास सुरू जाहला आगळा
स्वरांजली ही दिव्य सुरांची
अर्पून गेली गानकोकिळा
अंजली राजाध्यक्ष