नासिक। प्रतिनिधी Nashik
नवीन पिढीस शुद्ध हवा,पाणी, पर्यावरण देणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यादृष्टीने श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सतत सक्रीय आहे. त्यांच्या या समाज व राष्ट्रोपयोगी कार्यात मी पर्यावरण विभागाची प्रमुख म्हणून आणि व्यक्तीशः कायम सहकार्याची भूमिका घेईल व शासन व सेवा मार्ग मिळवून ही चळवळ पुढे घेऊन जाऊ अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने गत पाच दिवसांपासून नाशिक महानगरात सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवातील पर्यावरण व दुर्गसंवर्धन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुंडे बोलत होत्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
याप्रसंगी व्यासपीठावर जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे,खासदार डॉ शोभाताई बच्छाव,आमदार सीमाताई हिरे, भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, केंद्रीय भूजल वैज्ञानिक प्राध्यापक उपेंद्र धोंडे,सह्याद्री फार्मचे मंगेश भास्कर, संजय वायाळ,डॉ श्रीहरी पितळे महाराज, कृषी पर्यावरण अभ्यासक कीर्ती मंगरूळकर, पशुसंवर्धन सह आयुक्त बाबुराव नरवडे,सहाय्यक आयुक्त सुनील हांडे, उपसचिव निवृत्ती मराळे,भाजपचे गिरीश पालवे प्रशांत जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सारख्या चळवळी विश्वास आणि विज्ञानाची सांगड कशी घालावी याबाबत लोकांना शिकवणी देत आहेत. पूजा,अर्चना, धर्म या विश्वासाच्या गोष्टी विज्ञानाशी कशा जोडाव्या हे इथे शिकविले जात आहे. यातून खूप चांगली पिढी निर्माण निश्चितच होईल याबाबत शंका नाही पण या पिढीस सकस धान्य शुद्ध पाणी कसे देता येईल यावर आता आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. पर्यावरण, प्रकृती, पशुधन अशी सर्वच खाती माझ्याकडे असल्यामुळे मला कामाची खूप संधी आहे पर्यावरण वाचवविण्यासाठी, गोवंश वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचा विचार आहे. सेवा मार्ग राबवित असलेल्या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन अभियानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. गोपीनाथ गडावर काम सुरू करण्यापूर्वी आपण पाच हजार झाडे लावून तेथील पर्यावरणाची काळजी कशी घेतली हे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील युवकांना शेतीशी संबंधित इतर छोटे मोठे उद्योग करता यावेत यासाठी विविध प्रकारची आर्थिक मदत करण्याची सरकारची भूमिका असून कुकुट,शेळी, मेंढी पालन यासारखे अनेक उद्योग ग्रामीण भागात करून त्याचा उपयोग स्वतःला आर्थिक दृष्ट्या संपन्न बनविण्यासाठी युवक करू शकतात . असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.
प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या भव्य दिव्य महा कुंभमेळ्याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, नाशिक येथे लवकरच कुंभमेळा होत असून प्रयागराज चा आदर्श घेऊन नाशिक येथेही येथेही आपल्याला पाणी, स्वच्छता व इतर गोष्टींचे शिस्तबद्ध नियोजन कसे आदर्शरीत्या करता येईल?याबाबत महाराष्ट्र शासन गंभीर आहे.
या प्रसंगी आबासाहेब मोरे यांनी पुष्पगुच्छ ऐवजी त्यांना बी बियाण्यांची छोटीशी पिशवी भेट दिली. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . मंत्री मुंडे यांनी संपूर्ण प्रदर्शनास 35 मिनिटे भेट देऊन तेथील सर्व स्टॉल धारकांशी चर्चा करून माहिती घेतली.