Saturday, May 4, 2024
Homeनाशिकलॉकडाऊन नव्हे तर त्रिसूत्रीद्वारे करोनावर मात शक्य

लॉकडाऊन नव्हे तर त्रिसूत्रीद्वारे करोनावर मात शक्य

नाशिक । Nashik (कुंदन राजपूत)

नाशिकमध्ये पुन्हा लॉकडाऊनची आवश्यकता नाही. लॉकडाऊनमुळे दुसर्‍या समस्या निर्माण होऊ शकतात. यंत्रणेत समन्वय नाही ही निव्वळ चर्चा आहे. मालेगावप्रमाणे नाशिकमध्येही रुग्णसंख्या आटोक्यात येईल.

- Advertisement -

मात्र औषधोपचाराद्वारे करोना आटोक्यात आणण्याऐवजी नागरिकांनी संयम पाळून शारीरिक अंतर, मास्कचा वापर आणि अनावश्यक न फिरणे ही सूत्रे अवलंबली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. त्यांच्याशी साधलेला हा संवाद …

मालेगावमध्ये लोकसंख्येची घनता जादा आहे. त्या तुलनेत नाशिक शहराची कमी. असे असताना परिस्थिती नियंत्रणात का येत नाही?

मांढरे: नाशिकची घनता कमी असली तरी शहराची लोकसंख्या मालेगाव शहराच्या जवळपास तिप्पट आहे. तसेच इतर जिल्ह्यातून येणार्‍या जाणार्‍यांची संख्या मालेगावपेक्षा काही पट अधिक आहे. मालेगावमध्ये सुद्धा एकेकाळी संख्या खूप वाढली व नंतर हळूहळू कमी होत गेली. नाशिक शहरात देखील रुग्णसंख्या नक्किच कमी होईल.

रुग्णसंख्या वाढण्याचे नेमके कारण काय व ती आटोक्यात आणण्यासाठी काही विशेष प्लॅन अंमलात आणणार?

मांढरे: नागरिकांनी जास्तीत जास्त दक्षता बाळगणे आवश्यक असून हे सर्वात महत्वाचे. हा आजार हॉस्पिटलमध्ये जाऊन बरा करून घेण्यापेक्षा तो टाळणे हाच यावरचा सर्वात मोठा उपाय आहे. संपूर्ण जगभर याच प्रकाराने या आजारावर नियंत्रण आणले जात आहे. ही जागतिक महामारी असून हे संकट सर्वच घटकांनी आपापले योगदान देऊन दूर करण्यासाठी प्रयत्नशील झाले पाहिजे. दुसर्‍यांकडे बोट दाखवण्याचे सोपे आहे. पण स्वतःचे दोष दूर करुन या लढाईत काही योगदान देता येईल का अशा पद्धतीने सर्व घटकांनी पुढे आले पाहिजे.

रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकिय सेवा सक्षम आहे का? अनेक ठिकाणी साधन सामुग्री धूळखात पडल्याचे समोर आले.औषधाचा तुटवडा आहे का?

मांढरे:काल-परवापर्यंत या विषयावर फारशी चर्चा होत नव्हती. ती गेल्या 2-4 दिवसांपासून अचानक खूप मोठ्या प्रमाणावर राज्यभर सुरू झालेली आहे. औषधे वापरण्याबद्दल राज्यस्तरीय व देश स्तरीय तज्ञांकडून वेगवेगळ्या सूचना येतात. त्यामुळे काही औषधे वापरली जातात व काही औषधे वापरली जात नाहीत. यासंदर्भात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले पाहिजे. व्यवस्थेतील दोष अथवा उणिवा शोधणे हे सर्वात सोपे काम असते. या जागतिक महामारीची व्याप्ती विचारात घेऊन दुसर्‍यामधील दोष दाखवत राहण्यापेक्षा आपण ते दूर करण्यासाठी अथवा इतर प्रकारे या संकटावर मात करण्यासाठी देशाला कशा प्रकारे मदत करू शकतो.

महापालिका व पोलिस – आयुक्त नवे असून पुन्हा समन्वयाची समस्या निर्माण होऊ शकते. मध्यला काळात अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याची चर्चा होती ?

मांढरे: समन्वयाची कोणतीही समस्या नाशिक शहरांमध्ये कधीही नव्हती. उलट पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद,पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये अभूतपूर्व समन्वय होता व आजही आहे. अशा चर्चांऐवजी सर्वांनी करोनाविरुध्द एकजुटीने काम करणे अपेक्षित आहे.

पुन्हा लॉकडाऊनची आवश्यकता आहे?

मांढरे: लॉकडाऊन हा कायमस्वरूपी इलाज नसून ज्या वेळेला त्याची गरज होती त्या वेळेला केला गेलेला आहे. लॉक डाऊन असताना देखील जीवनावश्यक गोष्टींच्या नावाखाली जर नियम पाळले जाणार नसतील तर त्याचा उपयोग होत नाही. खूप लांबलेल्या लॉक डाऊनमुळे दुसर्‍या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लॉकडाऊन ऐवजी नागरिकांनी संयम पाळून शारीरिक अंतर, मास्कचा वापर आणि अनावश्यक न फिरणे ही सूत्रे अवलंबली पाहिजेत. तर करोनाविरुध्दची लढाई सोपी होऊन प्रशासनाला सहकार्य होईल

- Advertisment -

ताज्या बातम्या