नाशिक । प्रतिनिधी Nashik
मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी प्रारंभापासून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे गावठाण, जुने नाशिक, गंगापूररोड, कॉलेजरोड, रामवाडी, मेनरोड, भद्रकाली परिसर, इंदिरानगर इत्यादी भागातून ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे ‘विजय होणार विशाल… निशाणी आहे मशाल’ हा नारा गाजला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तसेच विविध घटक पक्षांचे पदाधिकारी मध्य नाशिक मतदारसंघातील उमेदवार वसंत गिते यांच्या प्रचारार्थ एकजुटीने रिंगणात उतरले आहेत. वसंत गिते यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत गंगापूररोड, कॉलेजरोड, अशोकस्तंभ, रविवार पेठ, सराफ बाजार, दहीपूल, मेनरोड, सोमवार पेठ, भद्रकाली, जुने नाशिक, काठे गल्ली, द्वारका, वडाळारोड, बोधलेनगर, शिवाजीनगर, तपोवनरोड, आंबेडकरनगर, गांधीनगर इत्यादी परिसर पिंजून काढला आहे.
नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीत शहर विकासासाठी आवश्यक असलेली गिते वचनांची पंचसूत्री मांडत आहेत. ‘भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक’साठी कार्यरत राहणार असल्याचे सांगताना आगामी कुंभमेळ्यापूर्वी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही गिते देत असल्याने मतदार प्रभावित झाले आहेत. गावठाणातील प्रश्न, बाजारपेठांंतील समस्या, बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांना बळ, वाहतूककोंडी, शिक्षण इत्यादी प्रश्नांबाबत सजग राहण्याचे अभिवचन वसंत गिते यांनी मध्य नाशिकच्या मतदारांना दिले आहे.
वसंत गिते यांच्या प्रचारासाठी खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. शोभा बच्छाव, उपनेते सुनील बागुल, प्रदेश संघटक विनायक पांडे, महानगरप्रमुख विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना महाले, प्रकाश मते, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, डॉ. हेमलताताई पाटील, शाहू (महाराज) खैरे, माजी महापौर यतीन वाघ, श्रमिक सेनेचे अजय बागुल, मामासाहेब राजवाडे, बाळासाहेब पाठक, शिवसेना विभागप्रमुख बाळासाहेब कोकणे, राजेंद्र बागुल, बबलू खैरे, सिराज कोकणी, वत्सलाताई खैरे, स्वाती जाधव, समीर कांबळे, माजी उपमहापौर गुलाम शेख, सचिन बांडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. गिते यांची ‘भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक’ ही संकल्पना नाशिकला खर्या अर्थाने तारू शकते, अशी भावना मध्य नाशिकचे मतदार व्यक्त करत आहेत.
ठाकरे चढवणार विजयाचा कळस
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील प्रचाराला प्रारंभ झाल्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी संवाद मेळाव्यात शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांसमोर ‘रोखठोक’ शैलीत भाषण केले. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यानंतर प्रचार मोहिमेला अधिक गती आली. मंगळवारी आडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेमुळे महाविकास आघाडीच्या प्रचार मोहिमेला अधिक बळ आले. मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वसंत गिते यांच्यासह शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.
राऊत व पवार यांच्या सभा यशस्वी झाल्याने शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता लागली आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे. ही सभा उत्तर महाराष्ट्रातील विक्रमी सभा असेल, असा विश्वास गिते यांनी व्यक्त केला. तसेच या सभेमुळे वसंत गिते यांच्या विजयाचे मताधिक्क्य वाढणार आहे. खा. राऊत यांनी गिते यांच्या विजयाचा पाया रचल्यानंतर ठाकरे कळस रचणार असल्याची भावना शिवसैनिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.