Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधयाचि देही याचि डोळा अतिवृष्टीने पोटात गोळा !

याचि देही याचि डोळा अतिवृष्टीने पोटात गोळा !

पावसाळ्यात (In the rain) दरवर्षी मुंबई तुंबते. जनजीवन ठप्प होते. मुंबईतील तशा परिस्थितीचा, किंबहुना त्याहून दाहक अनुभव आता कोकण, कोल्हापूर, सांगली आदी भागातील जनतेलासुद्धा दोन-तीन वर्षांपासून घ्यावा लागत आहे. उरात धडकी भरवणारी आणि डोळ्यांत दुःखाश्रू आणणारी अनपेक्षित नैसर्गिक घटना (Unexpected natural phenomena) नाशिक जिल्ह्यात नुकतीच घडली. कायम दुष्काळाच्या छायेत असणार्‍या नांदगाव शहर (Nandgaon) आणि तालुक्यात गेल्या आठवड्यात ढगफुटीसारखा (Cloudburst) जोरदार पाऊस बरसला. ध्यानीमनी नसताना अतिवृष्टी (Heavy rains) आणि महापुराचा (floods) सामना तेथील नागरिकांना करावा लागला.

रस्ते जलमय होणे, ठिकठिकाणी पाणी तुंबणे, रेल्वेमार्ग पाण्याखाली जाणे, रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होणे हे चित्र मुंबईत दरवर्षीच्या पावसाळ्यात हमखास दिसते. मुंबईकर त्याचा वर्षानुवर्षे सामना करीत आहेत. मुंबईत पाणी तुंबले नाही असे एकही वर्ष जात नाही. पावसाळ्यात मुंबई तुंबणे आणि जनजीवन ठप्प होणे मुंबईकरांना आता नवलाईचे वाटत नाही. त्यांना त्याची सवय झाली आहे.

मुंबईतील तशा परिस्थितीचा, किंबहुना त्याहून दाहक अनुभव आता कोकण, कोल्हापूर, सांगली आदी भागातील जनतेलासुद्धा दोन-तीन वर्षांपासून घ्यावा लागत आहे. उरात धडकी भरवणारी आणि डोळ्यांत दुःखाश्रू आणणारी तशीच अनपेक्षित नैसर्गिक घटना नाशिक जिल्ह्यात नुकतीच घडली.

- Advertisement -

नांदगाव हा शहरी भाग मानला जात असला तरी त्याचा तोंडवळा ग्रामीणच आहे. कायम दुष्काळाच्या छायेत असणार्‍या नांदगाव शहर आणि तालुक्यात गेल्या सोमवार-मंगळवारी रात्री 11 ते 3 च्या सुमारास ढगफुटीसारखा जोरदार पाऊस बरसला. परिसराला अतिवृष्टीने झोडपून काढले आणि हादरवूनही सोडले. भर पावसाळ्यात नदीपात्र बव्हंशी कोरडेच पाहणे नांदगावकरांच्या अंगवळणी पडले आहे, पण ध्यानीमनी नसताना चक्क अतिवृष्टी आणि महापुराचा सामना त्यांना करावा लागला.

नाशिक जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस जेमतेम आहे. सरासरीच्या 76 टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. याउलट दुष्काळी छायेतील नांदगाव आणि मालेगाव तालुके मात्र पावसाच्या बाबतीत भाग्यवान ठरले आहेत. दोन्ही तालुक्यांत पावसाने शतक ओलांडले आहे. नांदगाव शहर परिसरात अतिवृष्टीच्या दिवशी 12 तासांत 123 (पाच इंच) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नांदगाव तालुक्यात 133 टक्के पाऊस झाला.

एवढा पाऊस नांदगावकरांनी आधी कधी पाहिला नसेल. मालेगाव तालुक्यात त्या खालोखाल 114 टक्के पाऊस पडला. नांदगाव शहरातून वाहणारी शाकंबरी नदी आणि लेंडी नाल्याला मंगळवारी रात्री मोठा पूर आला. अचानक ओढवलेल्या नैसर्गिक संकटाचा अंदाज लोकांना यायला थोडा वेळ लागला, पण पुराचा हादरा मोठा होता. पुराचे पाणी शहरात शिरले. बाजारपेठेलाही त्याने वेढा घातला.

वेगवान प्रवाहाने नदीकाठची घरे, त्यातील संसार आणि दुकानांना मालासह स्वत:सोबत वाहून नेले. किराणा, पादत्राणे, स्टेशनरी, चहा टपरी, मोबाईल, इलेक्ट्रिक आदी अनेक लहान-मोठी दुकाने त्यात होती. तालुक्यातही जोरदार पावसाने हाहाकार उडवून दिला. कमी वेळेत जास्तीत जास्त पाऊस पडल्याने गावोगावचे साठवण बंधारे भरले. पाण्याच्या दाबाने अनेक बंधारे फुटले. पूरपाणी आजूबाजूच्या शेत-शिवारांमध्ये घुसले. पुराने शेतांतील पिके जमीनदोस्त केली. घरे कोसळली. अनेक मुकी जनावरे वाहून गेली.

साकोरे गावात बंधार्‍यालगतच्या पोल्ट्री फार्ममध्ये पुराचे पाणी शिरून हजारो कोंबड्या मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पावसाने केलेली दैना उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय संकटग्रस्तांपुढे पर्याय नव्हता.

कोसळणारा पाऊस त्यांच्या डोळ्यांतूनही वाहू लागला. पावसाने दुष्काळ घालवल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त करायचे की, पुराच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीबद्दल दु:ख; हेच कोणाला कळले नसेल. यादरम्यान जीवितहानीचे वृत्त नाही हे सुदैव!

मध्य रेल्वेलासुद्धा नांदगावच्या पुराचा फटका बसला. पुराचे पाणी वाहून जाण्याला अडथळे आल्याने निर्माण झालेल्या फुगवट्याने पूरपाणी आजूबाजूला पसरले. अगदी ते नजीकच्या नांदगाव रेल्वेस्थानकातदेखील शिरले. रेल्वेच्या सब-वेवर सुमारे 8 फूट पाणी भरले. रेल्वेमार्ग 3 ते 4 फूट पाण्याखाली बुडाले. परिणामी सुमारे 4 ते 5 तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून दोन्ही मार्गावरच्या रेल्वेगाड्या दूरवर सुरक्षित स्थानकांवर थांबवून ठेवाव्या लागल्या.

मुंबईसारखी स्थिती नांदगावात उद्भवल्याबद्दल रेल्वे खात्याचे अधिकारीही आवाक झाले असतील. तथापि पाऊस आणि पुरामुळे रेल्वेमार्गाचे कोणतेही नुकसान झाले नाही, याचे समाधान रेल्वे प्रशासनाला वाटत असेल.

नांदगाव तालुक्यात सुमारे 58 हजार हेक्टरांतील खरीप पेरण्या धोक्यात आल्याचा तसेच 68 हजार शेतकर्‍यांना अतिवृष्टी आणि पुराची झळ बसल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यावरून पीक नुकसानीची व्यापकता सहज लक्षात येते. टोमॅटो, भाजीपाला आणि तत्सम पिकांना मातीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी आधीच निराश झाले आहेत. नांदगाव तालुक्यातील शेतकरीही त्याला अपवाद नसतील.

त्या नुकसानीचा भार सोसत असतानाच अतिवृष्टी आणि पुराचे संकट कोसळल्याने त्यांच्या दु:खाला पारावार उरला नसेल. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत. पंचनामे होतीलही, पण नांदगावसारख्या कमी पावसाच्या भागात अतिवृष्टी होऊन महापुराचे संकट का ओढावले? यामागची कारणे स्थानिक पातळीवर शोधण्याची नितांत गरज आहे.

2009 साली नांदगावकरांनी पुराचा अनुभव घेतल्याचे सांगितले जाते. तरीही त्यापासून बोध न घेता नदीकाठावर घरे बांधणे अथवा दुकाने लावणे म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखेच नाही का? नगरपालिका आणि सरकारी यंत्रणांनीही त्याबाबत गांभीर्य दाखवले नाही. ताज्या संकटाचा आणि नुकसानीचा कटू अनुभव पाहता नदी अथवा नाल्यालगत संसार वा व्यवसाय थाटण्याचा मोह यापुढे तरी आवरला जाईल का? नगरपालिका प्रशासन त्याबाबत जागरूकता दाखवेल का? अमेरिका, मेक्सिको आदी देशांतसुद्धा सध्या अतिवृष्टी सुरू आहे. तेथेही पूरस्थिती उद्भवली आहे.

शहरी भाग जलमय झाला आहे. त्यासारखेच चित्र भारतातील नांदगाव शहरातही पाहावयास मिळाले. मनमाड शहरात रामगुळणा आणि पांझण या दोन नद्या वाहतात, पण चांगला पाऊस झाला तरच! दोन्ही नद्यांचा शिवाजीनगरजवळ संगम होतो. दुर्दैवाने अतिवृष्टीचे संकट ओढवले तर मनमाडच्या नदीकाठालगतसुद्धा नांदगावसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्याबाबत नगर परिषदेने आतापासूनच जागरूक राहण्याची गरज आहे.

केवळ नांदगाव अथवा मनमाडच नव्हे तर जिल्ह्यात जिथे-जिथे नदीकाठालगत लोकवस्ती आहे तेथे-तेथे स्थानिक प्रशासनाने संभाव्य धोका वेळीच ओळखून काळजी घेतली पाहिजे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधून वाहणार्‍या गोदावरी नदीला चालू वर्षी अजून तरी मोठा पूर आलेला नाही. अन्यथा पंचवटी परिसर, चांदोरी-सायखेडा तसेच काठावरील इतर गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडतो. यंदा ती स्थिती कमी पावसामुळे उद्भवलेली नाही.

प्रशासनाकडून नांदगाव शहर आणि तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे केले जातील. यथावकाश काही बाधितांना सरकारी निकषांनुसार मदतही मिळेल, पण तेवढ्याने प्रश्न कायमचा सुटेल का? नैसर्गिक संकट ओढवून नुकसान झाले की, सरकारकडून पंचनामे केले जातात. आपद्ग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला जातो, पण पूरपरिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष का केले जाते? नुकसान झाल्यावर पंचनामे, भरपाई वा मदतीचे सोपास्कार पार पाडण्याऐवजी तशी वेळच येऊ नये म्हणून काळजी का घेतली जाऊ नये?

[email protected]

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या