Sunday, May 19, 2024
Homeनाशिकअखेर माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांची माघार

अखेर माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांची माघार

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदार संघातून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना भाजपकडून तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला माकपाला ही जागा सोडावी अशी मागणी माजी आमदार जे. पी. गावित यांनी केली होती. मात्र, शरद पवार यांनी भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्यामुळे गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीच्या डोकेदुखीत वाढ झाली होती. त्यातच आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून शरद पवार यांची यशस्वी मध्यस्थी झाली असल्याने गावितांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.

काल झालेल्या माकपच्या राज्य सचिव मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तसेच दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, माकपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रयत्न देखील करण्यात आले होते.

त्यानुसार, जे. पी. गावित आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी आम्हाला उमेदवारी द्या पण राष्ट्रवादी काँग्रेसने आमची मागणी मान्य केली नाही, आणि भाजपचा पराभव करायचा असेल तर एकास एक द्यायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस माघार घेत नाही म्हणून आपण एक पाऊल पुढे जाऊन माघार घेतली पाहीजे, म्हणून हा निर्णय घेण्याचे ठरवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या