कोणत्याही परिस्थितीशी आणि बदलांशी जुळवून घेणे हा मनुष्यस्वभाव मानला जातो. म्हणून माणसांनी रस्ते अपघातांशीही जुळवूनच घेतले असावे का? रस्ते अपघात आणि त्यामुळे होणार्या मृत्यूंची बातमी माध्यमात प्रसिद्ध झाली नाही असा क्वचितच एखादा दिवस उगवत असेल. अती वेगाने वाहने चालवणे प्रसंगी जीवावर देखील बेतू शकते हे माहित असुनही वेगात वाहने चालवण्याचा मोह माणसे का टाळू शकत नसावीत? रस्त्यावरील प्रत्येक वाहनचालकाला दुसर्या वाहनचालकाच्या पुढेच जायचे असते. त्यासाठी वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसवण्याची काही वाहनचालकांची तयारी असते.
नव्हे तसे ते करतातही. सिग्नल मोडतात. अतीवेगात वाहने हाकतात. कर्णकर्कश्य हॉर्न वाजवतात. प्रसंगी त्यांच्या चुकीची किंमत शेजारच्या वाहनचालकाला मोजावी लागू शकते हे अनेकांच्या लक्षात देखील येत नाही. किंवा येत असूनही त्याकडे डोळेझाक करण्याकडेच अनेक वाहनचालकांचा कल आढळतो. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुद्धा वाहनचालक सर्रास नियमांना बगल देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी या मार्गावरील नियमभंगाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याची आकडेवारी पोलीसांनी जाहीर केली आहे.
सप्टेंबर 2022 या एकाच महिन्यात तब्बल सोळा हजार वाहनचालकांनी वेगाची मर्यादा ओलांडली. पाच हजार वाहनचालकांनी वाहनांच्या मार्गिका (लेन कटिंग) बदलल्या. पंधराशे पेक्षा जास्त वाहनचालकांनी सुरक्षेचा पट्टा न बांधता वाहन चालवले. 2018 पासून या मार्गावर चारशेपेक्षा जास्त जीवघेणे अपघात झाले. त्यात साधारणत: चारशे पेक्षा जास्त लोकांनी त्यांचा जीव गमावला. 2021 मध्ये देशात झालेल्या एकूण अपघातांपैकी निम्म्यापेक्षा जास्त अपघात वाहनांच्या अतीवेगाने झाले आहेत. त्यात साधारणत 90 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. एका आकडेवारीनुसार 2013 मध्ये देशात रस्ते अपघातात साधारणत: दीड लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
2018 मध्ये अपघातातील मृतांची संख्या साडेचार लाखांच्याही पुढे गेल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. कोणताही अपघात झाला की अपघाताचे तात्कालिक कारण आणि मृतांची संख्या याचीच चर्चा जास्त होते. तथापि काही अपघातांमध्ये अनेकांच्या वाट्याला कायमचे अपंगत्व येते. काहींचे आयुष्य त्यामुळे कायमचे उद्वध्वस्त होते. त्याची दखल किती वाहनचालक घेतात? जीवघेणा अपघात झाला तर प्रसंगी मृत्यू होऊ शकतो किंवा कायमचे अधुपण वाट्याला येऊ शकते हा विचार सुद्धा भीतीदायक आहे. तथापि अपघात होतात म्हणून विकास थांबून कसे चालेल? रस्ते दर्जेदार बांधले जातील.
त्यामुळे वाहनांचा वेगही वाढेल. वाहनांच्या क्षमताही वाढत जातील. तथापि अपघात मात्र नक्की टाळता येऊ शकतील का? प्रशासकीय यंत्रणाही तसे प्रयत्न सातत्याने करत असते. रस्तोरस्ती मार्गदर्शनपर फलक लावले जातात. रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. त्याकाळात वाहनचालकांचे प्रबोधन केले जाते. तथापि वाहनचालकांचे समुपदेशन ठराविक काळापुरते मर्यादित नसावे. ते सतत केले जावे. वाहतूक साक्षरतेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा असे उपाय वाहतूक तज्ञ आणि अभ्यासक सुचवतात. त्यांचा गांभिर्याने विचार केला जावा. अपघात टाळता येऊ शकतात हे वाहनचालकांनीही लक्षात घ्यायला हवे. अर्थात त्यासाठी स्वभावाला, उत्साहाला आणि मोहाला मुरड घालावी लागते. पण शेवटी ‘जान है तो जहान है’ याचा विसर पडून कसे चालेल?